Friday, May 9, 2025

अग्रलेखसंपादकीयमहत्वाची बातमी

तलवारबाजीचा राजकीय खेळ

तलवारबाजीचा राजकीय खेळ

भारतात तलवारींना आधीपासूनच खूप महत्त्व राहिले आहे. राजे, महाराजे तलवारीचा वापर करायचे. तलवार हे गर्व प्रतिष्ठा आणि शौर्याचे प्रतीक आजही मानले जाते. महाराष्ट्र देशा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यांसमोर येतो, त्यावेळी शिवाजी महाराजांची भवानी मातेने दिलेली तलवार हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी त्यांच्या कार्यकाळात लंडनच्या म्युझियममधील महाराजांची ती तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. राज्यात तलवार बाळगण्याची परंपरा पेशवा राजवट, शाहू महाराज, मराठा सरदारांपर्यंत आपल्याला दिसते. देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून शक्तिप्रदर्शनावेळी लढाऊ वृत्तीचे प्रतीक म्हणून व्यासपीठावरून तलवार दाखवण्यात येऊ लागल्या. एखाद्या पक्षाच्या सभा रॅलीमध्ये नवीन काही तरी खळबळ घडणार आहे, असे सांगण्यासाठी, तसेच इतिहास रचला जाणार आहे, हे दाखवण्यासाठी तलवार म्यानातून बाहेर काढली जाऊ लागली. मात्र आता राज्यात तलवारबाजी केल्यास गुन्हे दाखल होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. आताच पोलीस गुन्हे का दाखल करत आहेत, याचा जनतेला पडलेला प्रश्न आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेमध्ये तलवार दाखवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. असे गुन्हे दाखल करण्याची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यभर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी सांताक्रूज येथे भाजप नेते मोहित कंबोज यांनी मलिकांविरोधात घोषणाबाजी करत तलवार काढली होती. याची तत्काळ दखल घेत मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख या दोन नेत्यांनी जाहीर कार्यक्रमात तलवार दाखवली, ही बाब कंबोज यांनी ट्वीट करून पोलिसांच्या निदर्शनास आणून देत दोन काँग्रेस मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मोहित कंबोज यांनी केलेली मागणी हे गैर नव्हती. कारण जर अशा पद्धतीने तलवार दाखवल्यावर कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर या नेत्यांवर कारवाई का होऊ नये? म्हणूनच या न्यायाने वर्षा गायकवाड व अस्लम शेख यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली. मात्र यावरून आघाडी सरकारमधील मित्रपक्ष काँग्रेसच्या नेत्यांनी गृहमंत्री वळसे-पाटील यांच्यावर टीका झाली होती.


शस्त्र अधिनियम कायदा १९५९ कलम ४ अनुसार अशा पद्धतीने शस्त्र बाळगणे किंवा दाखवणे हा गुन्हा आहे. यापूर्वी अनेक नेत्यांनी सभेमध्ये तलवार बाळगल्या आहेत. पण, त्यादरम्यान अशा पद्धतीच्या तक्रारी कोणी केल्या नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, हे उघड आहे; परंतु आताची परिस्थिती अशी आहे की, जर तू दाखवतोस, तू करतोस तर मी सुद्धा दाखवणार, मीही करणार. जर माझ्यावर कारवाई होत असेल, तर ती तुझ्यावर ही कारवाई व्हायला हवी, अशा पद्धतीचा ट्रेंड सध्या राजकारणात सुरू झाल्याने गुन्ह्याची नोंद होताना दिसत आहे. म्हणूनच जर एखाद्याने तक्रार केली तर समोरच्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला जातो. कारण कायद्यात तशी तरतूद आहे. त्यातून भाजप, त्यानंतर काँग्रेस व आता मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आता यापुढे तलवारी दाखवण्याच्या प्रकाराला आळा बसू शकतो. कारण विरोधी पक्षाच्या हातात आयते कोलीत देण्याची संधी तलवारबाजीमुळे मिळू शकते.


या आधी देशात शीख समुदायाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांना तलवारी भेट दिल्याची अनेक उदाहरणे देता येतील. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट दिलेल्या तलवारी दाखवून उपस्थितांच्या टाळ्या मिळवून घेतल्या. आपल्या राज्यातही अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील त्यांच्या अनेक जाहीर सभांमध्ये तलवार दाखवली होती. ऑक्टोबर २००५ मध्ये मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात तलवार दिसली होती. जेव्हा युवा नेते आदित्य ठाकरे यांना राजकारणात पदार्पण केले होते, तेव्हा देखील बाळासाहेबांनी आदित्य ठाकरे यांना तलवार हातात देऊन स्वागत केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अनेक सभांमध्ये तलवार प्रदर्शन केले होते. याशिवाय ऑगस्ट २०१८मध्ये पक्ष कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातामध्ये तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता. मग आता विषय असा येतो की, आताच का तलवार दाखवण्यावर गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. भारतात सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे तलवारीचे प्रदर्शन करणे बेकायदेशीर असल्याने तो गुन्हा मानला जातो, ही बाब खरी असली तरी आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली दिसत नव्हती. जाहीर कार्यक्रमात, सभेत तलवार दाखवल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा ट्रेंड मागील काही महिन्यांपासून सुरू झाला आहे. कायदा हा सर्वांना समान आहे. त्यामुळे राजकारणांमध्ये तलवारबाजीचा वापर कुरघोडी करण्यासाठी होऊ शकतो का? अशी शंका घेण्यात वाव आहे.

Comments
Add Comment