भिवंडी (प्रतिनिधी) : भिवंडी तालुक्यातील परिसरात खैर लाकडाचे सोलीव काम करण्याचे डेपो असून या डेपोमध्ये पडघा राहुर, जव्हार, मोखाडा, मुरबाड,वाडा परिसरातील १०० हून अधिक आदिवासी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पडघा येथील वन विभागाने हे काम बंद केल्याने आदिवासी बांधवांचा रोजगार ठप्प झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.
त्याचप्रमाणे डेपो मालक जव्वाद चिखलीकर यांच्या कडे शासनाच्या सर्व परवानग्या असतानाही जाणीवपूर्वक तेथील वन विभागाने काम बंद केल्याचा आरोप चिखलीकर यांनी केला असून त्यांनी वन विभागविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
जव्वाद चिखलीकर यांच्याकडे १९९९ पासून सोलीव काम करण्याचा ठेका आहे. सोलीव काम करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्या असतानाही वन विभागाचे अधिकारी जाणून बुजून बंदी आणत असल्याचा आरोप चिखलीकर यांनी केला आहे.