मुंबई (प्रतिनिधी) : लालबाग-परळ या भागातील मराठी माणूस आता किती टक्के उरला याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. या सर्व परिस्थितीला शिवसेना जबाबदार आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.लालबाग मेघवाडी येथील गुरूवारी झालेल्या पोलखोल सभेत रोजी आमदार नितेश राणे यांनी मराठी माणसाच्या नावावर मते मागणाऱ्या शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केले. शिवसेनेने २५ वर्षांच्या सत्ताकाळात मुंबईची केलेली दुर्दशा जनतेसमोर मांडली.
लालबाग-परळसारख्या भागातील मराठी माणूस आज चाळीतच राहतो आहे. आजूबाजूला टॉवर झाले, त्यात किती मराठी माणसे आहेत. टॉवरमध्ये २४ तास पाणी, पण चाळींमध्ये जेमतेम २ तास पाणी येते. इथला मराठी माणूस आज कल्याण-बदलापूरच्या पुढे हद्दपार झाला. यशवंत जाधव ४१ फ्लॅट घेतो, ठाकरेंचा मेहुणा ११ फ्लॅट घेतो. पण इथल्या मराठी माणसाला ३०० स्केअर फुटांचे एक घर घ्यायला आयुष्यभर संघर्ष करावा लागतो, याकडे नितेश राणे यांनी लक्ष वेधले.
अनेक पुनर्विकास प्रकल्पांमध्ये इथल्या मराठी माणसांची फसवणूक झाली. १०-१५ वर्षे घर खाली केलेल्या अनेक मराठी बांधवाना अजून त्यांची घरे मिळालेली नाहीत. शिवसेनेचे आमदार, खासदार श्रीमंत झाले. पण शिवसेनेने मराठी माणसाला गरीबच ठेवले, असा आरोप त्यांनी केला.
शिवसेनेसाठी आयुष्य वेचणारे सुधीर जोशी असतील, या भागातील चंदू मास्तर वाईरकर असतील, यांच्या घरी जायला उद्धव ठाकरेंना वेळ नाही. आज असे असंख्य शिवसैनिक वाईट अवस्थेत जीवन जगत आहेत. आजची शिवसेना ठाकरे फॅमिली आणि आजूबाजूच्या ४-५ लोकांच्या पुरतीच मर्यादित आहे, असे राणे म्हणाले. मुंबईतील बेस्ट कामगार आज कुठल्या अवस्थेत जगतो आहे.
वेळेवर पगार नाही की राहायला चांगले घर नाही, अशी अवस्था आज बेस्ट कामगारांची आहे. मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे शिवसेनेला सत्ता दिलीत ज्यांनी मुंबईला लुटून फक्त भ्रष्टाचार केला आहे. मुंबईची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. पुढील ५ वर्षे भाजपला एकहाती सत्ता द्या. लोकाभिमुख कारभार करून जनतेचे राहणीमान बदलून दाखवू, असे आवाहन नितेश राणे यांनी यावेळी केले.