मुंबई (प्रतिनिधी) : २६ जुलै २००५ पासून आजमितीस मिठी नदीच्या सुशोभीकरण आणि विकासाच्या नावाखाली ११५० कोटी खर्च केले, पण तरीही मिठी नदी स्वच्छ होत नाही. कारण आजही सांडपाणी, रासायनिक सांडपाणी नदीत बिनधास्त सोडले जात आहे. आता मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडविले जाणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिकेने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिठी नदीमध्ये दोन्ही बाजूकडून उत्सर्जित होणाऱ्या सांडपाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत पर्जन्य जलवाहिनी विभागाचे उपप्रमुख अभियंता विभाष आचरेकर यांनी अनिल गलगली यांना कळविले की, मुंबई महानगरपालिकेमार्फत मिठी नदीतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सल्लागार मे. फ्रिशमन प्रभू यांची नेमणूक करण्यात आली होती.
सल्लागाराने सादर केलेल्या तांत्रिक व व्यवहार्यता अहवालानुसार अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत कामे सुचविली आहेत. सल्लागाराने सुचविलेल्या अल्प मुदतीच्या उपाययोजनांतर्गत, गट क्र. १ अंतर्गत, फिल्टरपाडा, पवई ते डब्ल्यू. एस. पी. कंपाऊंड दरम्यान नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून ते मिठी किनाऱ्यालगत नियोजित मलनिसारण वाहिन्यांद्वारे वाहून नेऊन डब्ल्यू. एस. पी कंपाऊंड येथे प्रस्तावित ८ द.ल.घ.ली. एवढ्या क्षमतेच्या मलशुध्दीकरण केंद्रामध्ये प्रक्रीया करण्याचे प्रस्तावित केले आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर असून मे २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
पुढे त्यांनी अशी माहिती दिली की, सल्लागाराने सुचविलेल्या दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत गट क्र. २ अंतर्गत, मुख्यतः (भरती प्रवण क्षेत्र वगळता) छोट्या नाल्यामधून मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे इ. कामांचा अंतर्भाव आहे. ही कामे प्रगतीपथावर असून डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.