Sunday, July 21, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकेंद्राकडून नेहमीच लोकहिताची कामे

केंद्राकडून नेहमीच लोकहिताची कामे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विश्वास

अमित खोत

मालवण : केंद्र सरकारमध्ये काम करत असताना खूप समाधान मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच जनहिताचे प्रश्न जाणून घेतात, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देतात. केंद्रातील सरकार हे लोकहिताचे निर्णय घेणारे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधव, पर्यटन व्यावसायिक यांच्या समस्या जाणून घेत त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही आपण प्रयत्नशील आहोत, देवबाग किनारपट्टीवरील बंधाऱ्याचा प्रश्नही निश्चितच सोडवला जाईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवबाग येथे बोलताना व्यक्त केला. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्व स्तरातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी मालवण तालुक्याचा दौरा केला. कांदळगाव येथील श्री देव रामेश्वरचे दर्शन घेत सायंकाळी देवबाग येथे मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक व ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, पर्यटन महासंघ जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, नादार तुळसकर, तारकर्ली पर्यटन संस्थेचे रवींद्र खानविलकर, अध्यक्ष सहदेव साळगावकर, मंदार लुडबे, रामा चोपडेकर, जॅक्सन फर्नांडिस, नमिता गावकर, दाजी सावजी, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, मोहन कुबल, गणेश कुशे यांसह भाजप पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे

शून्य काम करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला. राज्यातील सरकार जायलाच पाहिजे. आरोप झाले तरी आपल्या मंत्र्यांना वाचवणे व विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, हेच काम हे सरकार करत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे अनेक जण राष्ट्रपती राजवटीची मागणीही करत आहेत. राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे, अशी भूमिका पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे यांनी स्पष्ट केली.

आमदाराने संरक्षण न घेता फिरावे

नितेश राणे यांना राज्य सरकारचे विशेष संरक्षण नाहीच आहे. मात्र येथील आमदाराला राज्य सरकारचे संरक्षण आहे, असे असताना नितेश राणे यांना संरक्षण न घेता फिरा, असे म्हणण्यापेक्षा येथील आमदाराने स्वत: संरक्षण न घेता दोन दिवस फिरावे. समस्याग्रस्त जनताच आमदाराला घेरल्याशिवाय राहणार नाही, असा टोला मंत्री राणे यांनी लगावला.

जनतेला फसवणे हीच शिवसेनेची भूमिका

गेल्या सात-आठ वर्षांत येथील विकास ठप्प होण्यास शिवसेना जबाबदार आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यात व ते सोडवण्यात शिवसेनेचे आमदार, खासदार अपयशी ठरले. सी वर्ल्ड, विमानतळ यालाही शिवसेनेनेच विरोध केला. खोटे बोलून जनतेला फसवणे व मते मिळवणे हे प्रकार येथे सुरू आहेत. मात्र या लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा जनतेला समजला आहे. त्यामुळे भविष्यातील निवडणुकीत जनता भाजपच्या पाठीशी ठाम राहील, असा विश्वास केंद्रीय मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

राणेसाहेबांच्या माध्यमातून विकास

अनेक ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी विचार मांडताना राणेसाहेबांच्या माध्यमातूनच देवबागचा विकास झाल्याचे सांगितले. बंधारा, रस्ते, वीज, पाणी हा विकास राणेसाहेबांमुळेच शक्य झाल्याचे ग्रामस्थांनी सांगत त्यांचे आभार मानले. जिल्ह्यात हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, इंजिनीअर कॉलेज व शिक्षण संस्था उभारणी करून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे, वडिलांच्या नावे ट्रस्ट उभारून अनेकांना मदत देणाऱ्या नारायण राणे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -