मुंबई (प्रतिनिधी) : यंदाच्या हंगामात अद्याप एकही सामना न जिंकलेल्या मुंबई इंडियन्ससमोर आपल्या पहिल्या विजयाचा श्रीगणेशा करण्याची संधी आहे; परंतु शनिवारी होणाऱ्या सामन्यात पराभवाचा दुष्काळ संपवण्यासाठी राजस्थानचे तगडे आव्हान आहे. पॉइंट टेबलमध्ये रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहेत, तर एकही सामना न जिंकता मुंबई तळाशी आहे. राजस्थानने सुरुवातीच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला आहे.
आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात २८ सामने खेळले असून मुंबई १४, तर राजस्थानने १३ सामने जिंकले आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ ८ सामन्यांत सहा विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. रॉयल्सला अव्वल ४ संघात टिकून राहण्यासाठी आणखी दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. दरम्यान, मुंबई या स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा आतापर्यंतचा हा सर्वात वाईट हंगाम आहे. कारण, पाच वेळचा हा चॅम्पियन संघ गेल्या आठ सामन्यांत एकदाही विजयी होऊ शकलेला नाही. अजूनही ते यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील सामन्यात लखनऊविरुद्ध मुंबईला ३६ धावांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. वानखेडे स्टेडियमवर घरच्या प्रेक्षकांसमोर १६९ धावांचा पाठलाग करताना, मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकली होती. मुंबईच्या फलंदाजी आणि गोलंदाजीने मोठी निराशा केली आहे.
दरम्यान राजस्थान हा सलग तीन सामने जिंकून विजयी पथावर आहेत आणि अडचणीत सापडलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सलग ४था विजय मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. त्यांच्या मागील सामन्यात, रॉयल्सने कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये बंगलोरचा २९ धावांनी पराभव केला. रियान परागच्या दमदार अर्धशतक आणि सनसनाटी गोलंदाजीच्या कामगिरीमुळे त्यांनी आरसीबीला ११५ धावांवर रोखून या हंगामातील सर्वात कमी धावसंख्येचा(१४४) बचाव केला. त्यांचे सलामीवीर जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी धावा केल्या आहेत. कर्णधार
संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर आणि शेवटच्या गेममध्ये नाबाद ५६ धावा करणारा रियान पराग आणि डॅरिल मिशेलची ताकद देखील राजस्थानकडे आहे. मुंबईचा माजी खेळाडू ट्रेंट बोल्टसह रॉयल्सचे वेगवान गोलंदाज अव्वल फॉर्ममध्ये आहेत तसेच रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल ही फिरकी जोडी आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहेत.
दुसरीकडे, मुंबईला ‘सामूहिक प्रयत्नांची’ गरज आहे. फॉर्मात नसलेल्या रोहित आणि इशान किशन या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करण्याची गरज आहे आणि तसे झाल्यास मधल्या फळीतील फलंदाजांसाठी ते चांगले आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि डिवाल्ड ब्रेविस यांनी वैयक्तिक चांगला खेळ केला आहे; परंतु त्यांना एकजुटीने खेळण्याची गरज आहे. मुंबईला मोठी धावसंख्या मिळवायची असेल किंवा कठीण लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर आघाडीच्या फलंदाजांपैकी एकाला तरी मोठी धावसंख्या करावी लागेल.
ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम, वेळ : रात्री ७.३०