Saturday, March 15, 2025
Homeकोकणरायगडकाचळी - पिटकिरी खारभूमीच्या कामात मोठा गैरव्यवहार ?

काचळी – पिटकिरी खारभूमीच्या कामात मोठा गैरव्यवहार ?

समितीने केली योजनेच्या कामाची पाहणी

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांनी खारलँड विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. समितीने गुरुवारी अलिबाग तालुक्यातील काचळी – पिटकिरी योजनेच्या बंधाऱ्याची पाहणी केली आणि तेथील निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांनी खारलँड विभागाच्या गलथान कारभाराचा पाढाच वाचला. आता समिती काय अहवाल देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील ६ योजनांसाठी ११४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. त्यातील अलिबाग तालुक्यातील काचळी – पिटकीरी योजनेच्या बंधाऱ्याला गुरुवारी विधिमंडळाच्या अंदाज समितीने भेट दिल्यावर खारभूमी विभागाचा गलथान कारभारावर सदस्यांनी खारभूमीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी खारभूमी विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे येथील पिकत्या भात शेतीची कशा प्रकारे वाट लागते आहे व ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे, याची वस्तुस्थिती समितीसमोर मांडली.

मागील दोन वर्षांपासून ६ किलोमीटर लांबीच्या काचळी – पिटकरी खारभूमी बंधाऱ्याचे काम सुरु आहे. या कामात अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी अनेकवेळा केलेली आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने येथील परिस्थितीमध्ये अजुनही काहीही सुधारणा झालेली नव्हती. आजही उधाणाचे पाणी थेट पिकत्या भातशेतीत शिरत आहे.

आ. रणजीत कांबळे अध्यक्ष असलेली विधिमंडळाची अंदाज समिती रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. अलिबाग येथे जिल्ह्यातील कामकाजाची चौकशी केल्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच या समितीने जिल्ह्यातील विविध कामांची प्रत्यक्ष पहाणी केली. त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमाला बगल देत अंदाज समितीने काचळी-पिटकिरी खारभूमी योजनेला भेट दिली. यावेळी अंदाजे ७० गाड्यांचा ताफा आला होता. अधिकारी, लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच खारभूमीच्या बंधाऱ्यावर आले होते व परिसरातील शेतकरीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी खारभूमीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा पाढाच समिती सदस्यांसमोर वाचत येथील शेती नापीक करण्यात अधिकाऱ्यांचा कशा प्रकारे सहभाग आहे, याचे सत्यकथन केले. स्थितीचा अंदाज आल्याने समिती सदस्यही चांगलेच संतापले होते. त्यांनी खारभूमीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर धरत रखडलेल्या कामाचा आणि झालेल्या खर्चाचा जाब विचारला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -