Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीसंयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांचा विसर पडला आहे का? – नितेश राणेंचे मुख्यमंत्री...

संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांचा विसर पडला आहे का? – नितेश राणेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांचा विसर पडला आहे का? असा सवाल करत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुंबईतील महाराष्ट्र कला दालनाच्या मुद्य्यावरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी हुतात्म्यांच्या बलिदानाचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतोय, असे म्हटले आहे.

“माननीय मुख्यमंत्री महोदय, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०७ मराठी हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. या हुतात्म्यांच्या बलिदानाचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतोय, कारण शिवाजी पार्क येथे या चळवळीच्या स्मृती स्मरणात राहव्यात यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कला दालनाची उभारणी करण्यात आली. त्याला आता ३० एप्रिल रोजी १२ वर्षे पूर्ण होतील, परंतु या कला दालनाकडे आपण हेतूपूरस्परपणे दुर्लक्ष करत आहात.” अशी आठवण नितेश राणे यांनी करुन दिली आहे.

“महाराष्ट्र दिन तोंडावर आलेला असताना, हे कला दालन अद्यापही पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही, ना इथे कुठली रंगरंगोटी केली गेलेली नाही. एवढच नाही तर कला दालनावर विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून सहा महिने उलटले तरी कला दालनावर विस्मरणाचा अंधार पडलेला आहे. उलटपक्षी या कला दालनाचा उपयोग अधिकाऱ्यांच्या पार्किंगसाठी व मिटींगसाठी केला जातोय”

“स्व. बाळासाहेबांच्या हेतूला बाजूला सारत स्वत:च्याच फोटोग्राफीसाठी आपण यातील एक मजला अडवलेला आहेच, आता संपूर्ण कला दालनच ठाकरे कुटुंबियांची प्रायव्हेट प्रॉपर्टी करण्याचा घाट तर आपण घालत नाहीयेत ना? अशी खदखद आता सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात आहे. सर्वच पातळ्यांवर आपण कला दालनाचा सर्वसामान्यांना विसर पडावा यासाठीची खबरदारी घेतली जात आहे.” असे नितेश राणे पत्रात म्हणतात.

पर्यटन खाते युवराजांकडे असतानाही कला दालनाचा समावेश महाराष्ट्र पर्यटन विकास कॉर्पोरेशनच्या सुचीमध्ये का केला जात नाही? यावरून हेच स्पष्ट होते आहे की आपली या कला दालनाबाबत असणारी मनिषा काही वेगळीच आहे. आपण जो महाराष्ट्राच्या अस्मितेचा उसना राग आळवता किमान त्याच्याशी तरी प्रामाणिक राहून १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कला दालनावर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे, याचा पर्यटन सुचीत समावेश करावा आणि आपल्या हेतूवर उठलेले शंकेच मोहोळ शांत करावे, अशी मागणी या पत्रात नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -