मुंबई : आयपीएल मधील ४३वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु असा होणार आहे. गुजरात टायटन्स आतापर्यंत आठ सामन्यांत सात विजयांसह गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांच्या प्रत्येक विजयात वेगवेगळे सामनाविजेते मिळाले असून हीच त्यांची जमेची बाजू आहे.
बंगळूरुबद्दल बोलायचे, तर आयपीएल २०२२च्या त्यांच्या मागील सामन्यात त्यांना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दयनीय पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरात टायटन्सचा सामना करताना कस लागेल.
सध्या नऊ सामन्यांतून पाच विजयांसह पाचव्या स्थानावर असलेल्या आरसीबीच्या विसंगत प्रदर्शनाचे एक कारण दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा फॉर्म आहे.
कोहलीने या मोसमात आरसीबीसाठी नऊ सामन्यांमध्ये केवळ १२८ धावा केल्या असून ४८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात, गुजरात टायटन्स १९६ च्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना झुंजत होते; परंतु लेग-स्पिनर रशीद खान आणि फिनिशर राहुल तेवतियाने शेवटच्या षटकात चार षटकार मारून सामना अक्षरश: हिरावून घेतला.
ठिकाण : ब्रेबॉर्न स्टेडियम, वेळ : दुपारी ३.३०