मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली असून, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने जॅकलिनची ७ कोटी १२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये २०० कोटींच्या फसवणुकीमुळे अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याकडून मिळालेली महागड्या भेटवस्तूंचा समावेश असून, जप्त केलेल्या संपत्तीपैकी जॅकलिनच्या ७.१२ कोटींच्या फिक्स डिपॉझिटचा समावेश आहे.
ईडीच्या माहितीनुसार सुकेश चंद्रशेखरनं लोकांकडून जबरदस्तीने वसुली केलेल्या पैशातून त्याने जॅकलीनला आतापर्यंत ५.७१ कोटींची महागडी गिफ्ट्स दिली आहेत. इतकेच नव्हे, तर सुकेशने जॅकलीनच्या कुटुंबीयांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नुकतीच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी झाली होती. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील नात्याच्या बातम्या समोर आल्यानंतर तिच्या अडचणी वाढल्या होत्या. श्रीमंतांना लक्ष्य करणे, बनावट उच्चपदस्थ अधिकारी बनणे, बॉलीवूड काम नसलेल्या अभिनेत्रींना भुरळ घालणारा सुकेश सध्या पतीला जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तुरुंगात असताना त्याने ही फसवणूक केली. या प्रकरणात तो दोषी आढळल्यास त्याला ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतचा त्याचा सेल्फी आणि नोरा फतेहीसोबतच्या नात्याचीही चर्चा झाली आहे.