मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे आमदार अमित साटम यांनी पुन्हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेच्या निविदा प्रक्रीयेत केंद्रीय सतर्कता आयोगाच्या सिव्हीसी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप साटम यांनी केला असून याबाबत सतर्कता आयोगाला पत्र दिले आहे.
दरम्यान निविदा इलेक्ट्रीक बस खरेदीच्या निविदा प्रक्रीयेत बोलीदारांसाठी दि. २५ एप्रील २०२२, सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती; परंतु याच दिवशी ३ वाजून ३५ मिनीटाला अचानकपणे शुद्धीपत्रक काढण्यात आले आणि यात निविदा भरण्यासाठी बोलीदारांच्या/कंत्राटदारांच्या पात्रता अटीच बदलण्यात आल्या होत्या, तर बदललेल्या पात्रता अटीत विदेशी कंपन्या आणि विदेशातील पात्रता अनुभवही ग्राह्य धरण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही अट अचानकपणे बदलणे कायदेशीर नाही. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे अमित साटम म्हणाले. मात्र यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले.
एका विशिष्ट परदेशी कंपनीला किंवा तसा अनुभव असणाऱ्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी राबवलेली निविदा प्रक्रीया असल्याचा आरोप करत तातडीने आपण ही निविदा प्रक्रीया रद्द करण्याचे आदेश देऊन सदरील प्रक्रीयेतील अनियमिततांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. व नव्याने व पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना द्याव्यात, असे अमीत साटम यांनी म्हटले आहे.