बीजिंग : चीनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन संसर्गाची लाट आली आहे. शुक्रवारी चीनमध्ये एकाच दिवशी २० हजारांहून अधिक ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. त्यामुळे चीन सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर असलेल्या शांघाईमध्ये तीन आठवड्यांपासून लॉकडाउन लागू केला आहे. राजधानी बीजिंगमध्ये २१ दशलक्षांहून अधिक लोकांनी तिसऱ्यांदा न्यूक्लिक अॅसिड चाचणी केली आहे.
चीनमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या शहरांच्या यादीत वाढ होत आहे. तर, दुसरीकडे आता बीजिंगमध्ये शनिवारपासून सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी ४८ तासांमध्ये केलेली कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. स्थानिक महापालिकेने याबाबतचा निर्णय घेतला आहे. कोरोना चाचणी अहवाल नसल्यास संबंधित नागरिकाला प्रवेश करण्यास मनाई असणार आहे.
वृत्तानुसार, बीजिंगमध्ये शुक्रवारी कोरोनासाठी अति जोखीम आणि मध्यम जोखीम अशा दोन गटात शहरांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार अति जोखीम असलेल्या गटात ६ आणि मध्यम जोखीम असलेल्या गटात १९ क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्या आम्हाला ओमायक्रॉनच्या संसर्गाचा सामना करावा लागत आहे. हा व्हेरिएंट अधिक वेगाने फैलावत आहे. जगातील बहुतेक देशांमधून या व्हेरिएंटचा प्रभाव कमी झाला असताना चीनमध्ये पुन्हा फैलावत आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी देशात २० हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, शांघाईमध्ये गुरुवारी १५ हजारांहून अधिक बाधित आढळले. मागील एका महिन्यात चीनमध्ये कोरोनामुळे ३३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्व शाळा बंद; विवाह सोहळा आणि अंत्यसंस्कारावर निर्बंध
शांघाईमध्ये लॉकडाउन असूनही कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे. बीजिंगमध्येही परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने मार्गदर्शक तत्वे, निर्बंध आणखी कठोर केले आहे. त्यानुसार बीजिंगमधील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून विवाह सोहळा आणि अंत्यसंस्कारावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.