Friday, October 31, 2025
Happy Diwali

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी उद्या होणार

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी उद्या होणार

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवनीत आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. पण, आजची सुनावणी टाळण्यात आली असून, यावर उद्या (शनिवार) निर्णय होणार आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने आजची सुनावणी टाळण्यामागचे कारणही दिले आहे. व्सस्त कामकाजामुळे न्यायालयाने आजची सुनावणी टाळली आहे. आज याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली होती की, याचिकाकर्ते दाम्पत्य निवडून आलेले आमदार आणि खासदार आहेत. प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आज सुनावणी घेण्यात यावी.

परंतू, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार, इतर अनेक महत्त्वाची प्रकरणे असल्यामुळे राणा दाम्पत्यांची सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला. न्यायालयाकडे आज जराही वेळ नाही, असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राणा दाम्पत्याला जामीनासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणांच्या घोषणेनंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. अखेर राणांनी आपली घोषणा मागे घेतली, पण त्यानंतर पोलिसांनी राणांना अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >