मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शरद पवारांनी वर्षा या निवासस्थानी भेट देत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा सुरू होती.
राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमुळे या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं असावं, अशा चर्चा रंगल्या आहेत. पण सध्या राज्यात अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद पाहायला मिळतो. राज ठाकरेंची औरंगाबाद सभा, भोंग्याचा मुद्दा, राणा दाम्पत्याला अटक, अनिल देशमूख आणि नवाब मलिक कोठडी आणि किरीट सोमय्यांवरील हल्ला या सगळ्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे याच विषयांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी, असं बोललं जात आहे.
या चर्चेदरम्यान, फक्त शरद पवार आणि मुख्यमंत्रीच उपस्थित होते. यावेळी राज्यातील विकास कामांच्या प्रकल्पांवरही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आहे. याविषयीदेखील या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.