नवी मुंबई (प्रतिनिधी) : केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या केलेल्या आवाहनाला उत्तर देताना जीएसटीचा मुद्दा पुढे करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या अज्ञानाचे पुन्हा दर्शन घडविले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात पेट्रोलवर ३२ रु. १५ पैसे इतका व्हॅट आकारला जातो आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर भाजपशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट तातडीने कमी केला. मात्र महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला नाही. राज्यांनीही आपल्या अखत्यारीतील करांचे ओझे कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा होती. पण दारूवरील कर कमी करणाऱ्या ठाकरे सरकारने पंतप्रधानांचे आवाहन झुगारून राजकारण सुरूच ठेवले व त्याचा थेट फटका नागरिकांना बसला. गेल्या सहा महिन्यांत या करांपोटी राज्य सरकारने साडेतीन हजार कोटींचा महसूल कमावला आहे.
सामान्य नागरिकांच्या खिशात हात घालून केलेल्या या कमाईबद्दल जनतेची माफी मागण्याऐवजी, केंद्र सरकारवर दुगाण्या झाडून जनतेची दिशाभूल करणारे ठाकरे सरकार जीएसटीचा पूर्ण परतावा मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवरील राज्याकडून आकारला जाणारा भरमसाठ दर कमी करणार आहे का? महाराष्ट्राने राज्यांतर्गत कर कमी केल्यास पेट्रोल डिझेलचे भाव किमान दहा टक्क्यांनी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. पण ठाकरे सरकारची ती इच्छा नाही. केंद्र सरकारशी संघर्ष करण्याच्या ठाकरे सरकारच्या खुमखुमीमुळे नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, आपण शिवतीर्थावरील सैनिकांच्या मेळाव्यात बोलत नसून, मुख्यमंत्रीपदावरून देशाच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आहोत याचे भान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवले असते, तर पंतप्रधानांचा दावा खोडून काढण्याच्या आविर्भावात त्यांनी नागरिकांची दिशाभूल करण्याचे धाडस केले नसते. जीएसटी परतावा व पेट्रोल-डिझेलवरील कर आकारणी या दोन्ही संपूर्ण स्वतंत्र बाबी आहेत. महाराष्ट्रातून जमा होणारा वस्तू व सेवा कराचा परतावा राज्याला नियमितपणे मिळत असून मुख्यमंत्री म्हणतात ती थकबाकी नाही. ही रक्कम केंद्राकडून महाराष्ट्रास मिळण्याकरिता जुलै २०२२पर्यंतचा अवधी असल्याने थकबाकी असल्याचा कांगावा करून ठाकरे नागरिकांचीही दिशाभूल करत आहेत.
मुळात ही रक्कमदेखील २६ हजार कोटी एवढी नाही, हे स्पष्ट असताना ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक होते. यापैकी १३ हजार ७८२ कोटींचा परतावा राज्य सरकारला अगोदरच मिळालेला असून उर्वरित १३ हजार ६२७ कोटी जुलैपर्यंत मिळणार आहेत. दूरसंवाद माध्यमांतून जनतेस संबोधित करताना केंद्राकडून सहकार्य मिळत असल्याचे सांगणाऱ्या ठाकरे यांनी मूळ मुद्द्यास बगल देत केंद्रावर आगपाखड करण्यास सुरुवात केल्याने, पेट्रोल-डिझेलवरील राज्याचे कर कमी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन झुगारत जनतेची लूट सुरूच ठेवण्याचा ठाकरे यांचा खेळ उघड झाला आहे.