वसंत भोईर
वाडा : तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा अंतर्गत असा डाकिवली केळठण रस्ता दुरुस्तीचे काम खासगी ठेकेदार कंपनीने बुधवार (दि. २७) पासून सुरू केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. त्यामुळे डाकिवली परिसरातील नागरिकांचा प्रवास वेगवान होणार असल्याचे दिसून येते आहे.
डाकिवली-केळठण हा रस्ता साडेपाच किलोमीटर अंतराचा असून या मार्गावर डाकिवली, चांबळे, लोहोपे, नेवालपाडा, केळठण आदी गावे येतात. विशेष म्हणजे, डाकिवली व लोहोपे या गावांच्या हद्दीत दगडखाणी असल्याने जड वजनाची वाहने या मार्गावरून दिवस रात्र ये-जा करत असतात. त्यामुळे कमी प्रती दर्जाच्या रस्त्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. रस्त्यावर गुडघ्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर वाहन चालवताना कसरत करावी लागते आहे. खराब रस्त्यामुळे आजारी व्यक्ती, गरोदर महिला, विद्यार्थी, नोकरदार यांचे फारच हाल होत असत. अपघात नित्याचेच होऊन बसले आहेत. त्यामुळे या रस्त्याला नागरिक अक्षरशः कंटाळले होते.
दरम्यान, या साऱ्या पार्श्वभूमीवर रस्ता सुस्थितीत व्हावा म्हणून नागरिकांनी अनेक आंदोलने केली. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम मंजूर केले. डाकिवली ते लोहोपे हा दोन किलोमीटर अंतराचा रस्ता काँक्रिटीकरणासाठी ७ कोटी, तर लोहोपे ते केळठण या साडेतीन किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणासाठी ४ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला. रस्त्याची निविदा काढून हे काम खासगी ठेकेदार कंपनीने अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने (बिलो) घेतले. याला काही ठेकेदारांनी आक्षेप घेऊन अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने काम घेतल्याने गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून मंत्रालयातून त्यावर स्थगिती मिळवली. दरम्यान, कामाला स्थगिती दिल्याने काम रखडले होते. रस्ता होणार म्हणून आनंदित झालेले नागरिक स्थगितीमुळे पुरते हिसमोड झाले होते.
दरम्यान, रस्ता स्थगितीमुळे पाच गावातील नागरिक संतापले. रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी एकवटले होते. यासाठी रस्ता संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा, या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाच गावांतील शेकडो ग्रामस्थ थेट रस्त्यावर उतरले. रणरणत्या उन्हात भिवंडी-वाडा हा महामार्ग काही काळ अडवला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा डाकिवली-केळठण रस्त्यावर नेला आणि तिथे ठाण मांडून बसले. सुमारे चार तास तो मार्ग अडवला. पोलिसांनी आंदोलकांना रस्ता अडवू नका म्हणून विनंती केली, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठोस उत्तर मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. अखेर या आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल बरसट यांनी घेऊन ते आंदोलन स्थळी पोहोचले.आणि काही दिवसांतच रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले होते.
नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला
दरम्यान, खासगी या ठेकेदार कंपनीने बुधवारपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून दुरुस्तीनंतर डाकिवली परिसरातील नागरिकांचा प्रवास वेगवान होणार असल्याचे दिसून येत आहे.