
मुंबई : वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात करत असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. विविध स्तरातील लोकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेत असल्याचे रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी म्हटले आहे. त्यांनी आज भायखळा रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ऐन उन्हाळ्यात सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेने एसी लोकल सुरू केली. पण, एसी लोकलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार वारंवार प्रवाशांकडून केली जात होती. त्यामुळे एसी लोकलला प्रतिसाद देखील मिळत नव्हता. 'वातानुकूलित रेल्वेच्या तिकीट दरात किती कपात करायला हवी, असे आम्ही वेगवेगळ्या स्तरातील लोकांना विचारत होतो. त्यावर कोणी म्हणत होते ३० टक्क्यांनी दर कमी करा, तर कोणी म्हणत होते २० टक्क्यांनी दर कमी करा. मात्र देशाचे पंतप्रधान हे नेहमी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत असतात. त्यामुळे आम्हीही सामान्य माणसासाठी निर्णय घेत वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात करत आहोत,' असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
'याआधी २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी मुंबईकरांना १३५ रुपये मोजावे लागत होते. मात्र तिकिटाची ही रक्कम यापुढे ६५ रुपये इतकी असणार आहे. तसेच ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करणाऱ्यांकडून याआधी २०५ रुपये तिकीट आकारले जात होते, हे भाडे आता १०० रुपये इतके असणार आहे,' अशी माहिती दानवे यांनी दिली.
यामुळे सीएसएसटी ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या एसी लोकलमधील प्रवासाला एका तिकीटासाठी १३० रुपये मोजावे लागायचे तिथे आता ९० रुपये आकारले जाणार आहे. तर चर्चगेट ते वसई रोड या ५२ किलोमीटरच्या प्रवासाला २१० रुपये द्यावे लागायचे तिथे आता १०५ रुपये द्यावे लागणार आहेत.
किलोमीटर सध्याचे दर सुधारीत दर
५ ६५ ३०
२५ १३५ ६५
५० २०५ १००
१०० २९० १४५
१३० ३७० १८५