पुणे : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची चर्चा २०१७ साली झाली होती; मंत्रिपदंही ठरली होती. राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढायच्या याची चर्चा भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झाली होती. नेतृत्वाने ठरवले की आपण तीन पक्षांचे सरकार करू मात्र शिवसेनेसोबत आमचे जमणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादीने सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला, असा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला होता.
त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. “आशिष शेलार यांनी २०१७ साली हे सांगायचे होते ना. पाच वर्ष का थांबलात?” असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.
आशिष शेलार यांनी २०१७ साली सांगायचे होते ना. पाच वर्ष का थांबलात? २०२२ मध्ये २०१७ साली असे झाले होते ते सांगायचे. २०१७ साली बरेच नेते इकडे तिकडे होते. त्यांची वक्तव्ये तेव्हा वेगळी होती आता वेगळी आहेत. महाराष्ट्राचे प्रश्न आधी पाहू. २०१७ ला असे झाले, तसे झाले, यात कोणाला रस नाही. आज काय आहे, महत्त्वाच्या समस्या कोणत्या, मूलभूत प्रश्न काय ते पाहूया, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.