Thursday, December 12, 2024
Homeमहत्वाची बातमीनाशिकमध्ये उष्माघाताने तिघांचा बळी

नाशिकमध्ये उष्माघाताने तिघांचा बळी

नाशिक : नाशिकमध्ये उष्माघाताने तिघांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. शहर परिसरात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने चक्कर येण्याचे प्रकारही वाढले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी चक्कर येऊन पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत उत्तम केशव खरात (वय ४१, रा. शारदा निकेतन अपार्टमेंट, कामटवाडा) हे २६ एप्रिल रोजी रात्री खुटवडनगर येथील लोखंडे जॉगिंग ट्रॅकजवळ वॉकिंगसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या भावाने त्यांना औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत विकास वामन भावे (वय ६८, रा. आपेवाडी, सिरजगाव, बदलापूर, जि. ठाणे) हे महसूल आयुक्त कार्यालयासमोरील आयएसपी कॉलनी येथील महाराष्ट्र अॅलोटा इंजिनिअर अॅण्ड रिसर्च अॅकॅडमी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी आले होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून तयारी करीत असताना त्यांना अचानक चक्कर आली व ते खाली जमिनीवर कोसळले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तिसऱ्या घटनेत मोहन चांदमल वर्मा (वय ६८, रा. मॉडेल कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड) हे बुधवारी दुपारी मखमलाबाद गाव येथील लक्ष्मीनगर येथे राहणारे शिवप्रसाद वर्मा यांच्याकडे उधारी मागण्यासाठी आले होते. त्यावेळी ते अचानक चक्कर येऊन पडले व बेशुद्ध झाले. नागरिकांनी त्यांना मखमलाबाद येथील विठाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक औषधोपचार करून पुढील औषधोपचारासाठी त्यांच्या मुलीने कॉलेज रोडवरील लीलावती हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -