
मुंबई / लखनऊ : महाराष्ट्रासह देशभरात भोंग्याचे राजकारण सुरू असून राज्याच्या राजकारणामध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना" असे म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1519555642801135617
महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तर राज्याबाहेरही अनेक हिंदू संघटना यावरून आक्रमक झाल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी सुमारे ११ हजार लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. तर, ३५ हजार २२१ ठिकाणी आवाजाच्या मर्यादेतच लाऊडस्पीकर वाजविण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत बुधवारपर्यंत राज्यातील विविध प्रार्थनास्थळाहून तब्बल १० हजार ९२३ लाऊडस्पीकर काढून घेतले आहेत. एका परिसरातून बाहेर जावा, एवढा आवाज लाऊडस्पीकरमध्ये नसावा, लोकांना या ध्वनीक्षेपकाचा कुठलाही त्रास होता कामा नये, असे योगींनी म्हटले होते.
उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनिश कुमार अवस्थी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्यातील विविध प्रार्थनास्थळावरील नियमबाह्य लाऊडस्पीकर हटविण्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठीचा आदेश २५ एप्रिल रोजी काढण्यात आला असून ३० एप्रिलपर्यंत अंमलबजावणी करण्याचेही या आदेशात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमधील मंदिरांपासून ते अगदी लखनऊमधील शिया मशिदींपर्यंत सर्वांनीच यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मथुरेमधील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराने रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन म्हटली जाणारी मंगल चरण आरती भोंग्यावर न वाजवण्याचा निर्णय घेतला. भागवत भवन येते श्री कृष्ण जन्मभूमीच्या आवारामध्ये रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन एक तास आरती ऐकवली जायची. अशाच प्रकारे अयोध्येसहीत इतर शहरांमधून प्रतिसाद मिळत असून अनेकांनी स्वइच्छेने आवाजावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनऊमधील इदगाहचे इमाम असणाऱ्या मौलाना खलिद रशिद फिरंगी महाली यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सर्व सुन्नी मशिदींना भोंग्यांचे आवाज कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. “आम्ही सर्व मशिदींमधील भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले असून आवाज मशिदीबाहेर येणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे,” असे इमाम म्हणाले.
दरम्यान, मशिदी किंवा मंदिरांवरील परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केली आहे. कोर्टानं परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही, असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारने प्रार्थनास्थळांवरील भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यातही, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वांचे एकमत झाले आहे.