Friday, December 13, 2024
Homeमहत्वाची बातमीकुशल मनुष्यबळ : विकासाला चालना देणारे खरे सामर्थ्य

कुशल मनुष्यबळ : विकासाला चालना देणारे खरे सामर्थ्य

प्रा. आदित्य गुप्ता

मार्च ते मे २०२० दरम्यानचा संपूर्ण टाळेबंदीचा काळ जरा आठवा. त्यावेळी केवळ दोनच गोष्टी होत्या. ज्यांनी जगणे थांबू दिले नाही. जीवन जगण्यातील गतिमानता कायम ठेवली-ते एक म्हणजे डेटा-आधारित  इंटरनेट जोडणी आणि घरपोच भाजीपाला आणि किराणा मालाचे वितरण. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात कधीच खंड पडला नाही. या सगळ्यामागे होते लॉजिस्टीकशी संबंधित हजारो अनामिक योद्धे. जे आपला जीव धोक्यात घालून गोदामांमधील सामग्री पॅक करून जवळच्या दुकानांमध्ये पोहोचवली आणि नंतर ती लोकांच्या घरी वितरित केली जाई. ट्रकचालकांपासून गोदामांमधून सामान उचलणाऱ्यांपर्यंत (पिकर्स), कंपनीच्या पुरवठा साखळी (सप्लाय चेन) व्यवस्थापकांपासून ते लॉजिस्टिक स्टार्टअप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत, पुरवठा साखळीशी (सप्लाय चेन) संबंधित व्यावसायिकांच्या संपूर्ण समूहाने प्रत्येक देशाला कोरोनाकाळात कार्यरत आणि  गतिमान  ठेवले.

इतके आवश्यक आणि अपरिहार्य क्षेत्र असूनही, लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात आवश्यक त्या प्रमाणात संघटित कौशल्याचा अत्यंत अभाव आहे. आम्ही  एमबीएचा अभ्यासक्रम शिकत असताना तर पुरवठा साखळी व्यवस्थापन हा विषय देखील अभ्यासक्रमात समाविष्ट झाला नव्हता. आता पुरवठा साखळी व्यवस्थापन हा एक विषय म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे; बहुतांश एमबीए स्कूलमध्ये अजूनही तो पर्यायी विषय म्हणून समाविष्ट केला जातो ही वेगळी गोष्ट आहे. चालकांना अजूनही चालक-सहाय्यक पद्धतीच्या माध्यमातूनच  प्रशिक्षित केले जात आहे. गोदामांशी (वेअर हाऊसिंग) संबंधित कामकाज  हे आजही पूर्णपणे नोकरीवर असताना काम करता करता शिकण्याची (ऑन-द-जॉब लर्निंग)  गोष्ट आहे. एका अंदाजानुसार, भारतीय लॉजिस्टिक क्षेत्रात दोन कोटींहून अधिक लोक कार्यरत आहेत, त्यामुळे हे क्षेत्र कृषी क्षेत्रानंतर दुसरे सर्वात मोठे रोजगार देणारे क्षेत्र ठरले आहे. दुर्दैवाने, यापैकी केवळ काही टक्के लोकांनाच  औपचारिक प्रशिक्षण मिळाले आहे. बहुतांश  लोकांनी काम करताना हे कौशल्य आत्मसात केले आहे.

लॉजिस्टिकशी संबंधित कौशल्यांनी आता लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि गेल्या दशकात लॉजिस्टिक संबंधित कौशल्ये निर्माण करण्यात लक्षणीय प्रगती झाली आहे. भारतातील लॉजिस्टिक संबंधित कौशल्य विकासाशी संबंधित

सद्य परिस्थिती खालीलप्रमाणे आहे –

लॉजिस्टिक कौशल्य परिषद : कौशल्य विकास आणि उद्यमशीलता  मंत्रालय आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्या माध्यमातून  सर्वसमावेशक  उपाय प्रदान करण्याच्या प्रयत्नाअंतर्गत, एक उच्च  उद्योग संस्थेच्या स्वरूपात लॉजिस्टिक क्षेत्र कौशल्य परिषदेची  (एलएससी ) स्थापना करण्यात आली आहे. एलएससीने ११ उपक्षेत्रे निश्चित केली आहेत आणि या सर्व क्षेत्रात प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीच्या दिशेने ही संस्था कार्यरत आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना संस्था : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीआय), २०१५ मध्ये सुरू करण्यात आली, या योजनेअंतर्गत, लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात विविध पदांच्या  नोकऱ्यांसाठी, विविध प्रशिक्षण संस्थांमधून राष्ट्रीय व्यावसायिक मानकांनुसार विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकवले जातात.

प्रशिक्षणार्थी उमेदवारी – आधारित पदवी पूर्व अभ्यासक्रम (अप्रेंटिसशिप-एम्बेडेड अंडरग्रेजुएट प्रोग्राम) : उच्च शिक्षणामध्ये लॉजिस्टिकशी संबंधित कौशल्ये एकत्रित करण्याच्या उद्देशाने, पदवी प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षम कौशल्ये वाढवून त्यांना उद्योगासाठी तयार करण्याच्या आनुषंगाने अनेक उच्चशिक्षण संस्थाआता प्रशिक्षण उमेदवारी-आधारित बी.ए/बी.कॉमची पदवी प्रदान करत आहेत.

विशेष संस्था : देशांतर्गत  जलवाहतुकीसाठी मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय देशांतर्गत जलवाहतूक संस्था (एनआयएनआय), रेल्वे इंजिन  चालकांसाठी  विभागीय रेल्वे प्रशिक्षण संस्था आणि लांब पल्ल्याच्या ठिकाणांपर्यंत रस्त्यावरून गाडी चालवणाऱ्या चालकांसाठी टाटा वाहन चालक प्रशिक्षण संस्थेसारख्या विशेष संस्था आहेत ज्या विशिष्ट पदांच्या नोकऱ्यांसाठी कौशल्ये प्रदान करतात. गतिशक्ती प्रकल्पाच्या शुभारंभासह, आपल्या वाहतूक पायाभूत सुविधा जगातील सर्वोत्कृष्ट बनवण्याच्या दिशेने भारत एक मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करत आहे. समर्पित मालवाहतूक मार्गिका, भारतमाला, सागरमाला यांसारखे प्रकल्प भारतातील वाहतुकीशी संबंधित परिदृश्य पूर्णपणे बदलत आहेत.

उद्योग जगत आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य : विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये उद्योग आणि शैक्षणिक संस्थांचा सहभाग असावा, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना लगेचच रोजगार मिळण्यायोग्य बनवण्याच्या अनुरूप अभ्यासक्रम आणि शिक्षणसंबंधी साहित्याची रचना करण्यात यावी, अशा प्रकारे या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची खात्री मिळेल आणि उद्योग जगताला सातत्याने प्रशिक्षित मनुष्यबळाचा समूह  मिळेल, याचा फायदा सर्व हितसंबंधीयांना होईल.

म:नुष्यबळाचे कौशल्य संवर्धन : लॉजिस्टिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सध्याच्या मनुष्यबळाची कौशल्ये वाढवणे हे  या क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण  करण्यासाठी  आवश्यक आहे. कौशल्य वृद्धीमध्ये छोट्या  गुंतवणुकीचा वापर करून मोठे फायदे देण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ, गोदामामध्ये  चांगल्या व्यवस्थापनासाठी अन्य गोष्टींव्यतिरिक्त स्वयंचलन , सुरक्षा संबंधित आवश्यकता, डब्ल्यूएमएस आणि अनुपालन या गोष्टींसह विद्यमान कर्मचाऱ्यांमधील कौशल्याचा विकास करता येईल.

पात्रता विषयाची अंमलबजावणी अनिवार्य : आज लॉजिस्टिक्स क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश लोकांकडे या क्षेत्राशी संबंधित कोणतेही औपचारिक शिक्षण नाही. नोकरीसाठी पात्रता ही पूर्वअट करणे आवश्यक आहे. ही पात्रता नोकरीच्या प्रकारानुसार म्हणजेच प्रमाणपत्र, पदविका  किंवा पदवी असू शकते, मात्र  ती अनिवार्य केली पाहिजे. ही अंमलबजावणी नियोक्ते आणि कर्मचारी दोघांनाही कोणत्याही उद्योगात प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक पात्रता प्राप्त करण्यास प्रोत्साहित करेल.

मातृभाषेतून  अभ्यासक्रम : लॉजिस्टिक उद्योगात प्रवेश करणाऱ्या सुमारे दोन तृतीयांश कामगारांनी त्यांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत घेतलेले आहे. लॉजिस्टिकशी संबंधित कामे करण्यासाठी इंग्रजीमध्ये संवाद साधण्याची क्षमता आवश्यक नाही. लॉजिस्टिकशी संबंधित अभ्यासक्रम अनेक भाषांमध्ये तयार केले जावेत आणि शिकवले जावेत जेणेकरून मोठ्या संख्येने लोक ते अभ्यासक्रम समजून घेऊ शकतील आणि कुशल होऊ शकतील.

प्रशिक्षकांना प्रशिक्षण : आपल्याला  प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी एका उच्च प्रशिक्षण संस्थेची आवश्यकता आहे, ज्याप्रमाणे आरबीआय इतर सर्व बँकांसोबत करते त्याप्रमाणे सर्व लॉजिस्टिक प्रशिक्षण संस्थांच्या सर्व शिक्षकांना ही संस्था प्रशिक्षण देईल. प्रशिक्षकाकडे एक उद्योग विशेष व्यावहारिक कौशल्य असणे आवश्यक आहे आणि त्याला या क्षेत्रातील अद्ययावत प्रगतीसोबतच ऑनलाइन शिक्षण  कौशल्ये आणि अध्यापनाशी संबंधित सूक्ष्म कौशल्यांची सतत जाणीव असावी.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीच्या संधी : लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असलेले देश मोठ्या संख्येने आहेत. भारतातील फोर्कलिफ्ट चालकांना मध्य-पूर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळतात. भारताची  पात्रता मानके जगभर स्वीकारली जातील आणि भारतीय विद्यार्थ्यांना विविध देशांमध्ये रोजगार मिळू शकेल या दृष्टीने, आपण आपल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आधारे प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण उपकरणे : लॉजिस्टिक संबंधित कौशल्ये  सैद्धांतिक कमी, व्यावहारिक अधिक आहेत. प्रशिक्षण संस्थांमध्ये मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्यासाठी आवश्यक असलेली, सिम्युलेटर, ड्रायव्हिंग ट्रॅक, गोदामासारखी व्यवस्था तयार करणे, फोर्कलिफ्ट आणि इतर उपकरणे असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण उपकरणे उपलब्ध नसल्यास विद्यार्थी उद्योगांमध्ये काम करण्यासाठी  तयार होणार नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -