संतोष वायंगणकर
महाराष्ट्रात सध्या राजकीय शिमगोत्सव सुरू आहे. विविध राजकीय पक्षांच्या राजकीय कुरघोडी नाट्याचा आनंद सध्या महाराष्ट्र घेतोय. एकीकडे महाराष्ट्रातील राजकारणात रोज नवनवीन मोड घेत असताना अधून-मधून उष्णतेची लाट आणि मध्येच जून-जुलै महिन्यात बरसावा, असा कोसळणारा पाऊस कोणालाच काहीच सूचत नाही. उद्याच काय होईल हे सांगता येणार नाही. यामुळे जे चाललंय ते सारेच अस्थिर आहे. स्थिरता कशातच नाही. महाराष्ट्रातील जनतेचे सध्या असंख्य प्रश्न खरं म्हणजे ऐरणीवर आहेत; परंतु त्याची चर्चा कुठे गंभीरतेने होताना दिसत नाही. कारण यासाठी आवश्यक असणारी चर्चा करायला लागणारा पुरेसा वेळ कुणापाशीच नाही. सर्वसामान्य जनतेचा जगण्याचा जीवन संघर्ष फार मोठा आहे. भाकरीच्या संघर्षपुढे साऱ्या गोष्टी खुज्या वाटू लागतात. निसर्गाचे ऋतुचक्र बदललंय यामुळे शेतकरी, कष्टकऱ्याचे सारे अंदाज चुकतायत. कोकणचा विचार करताना कोकणातील मच्छीमार, आंबा, काजू बागायतदार, व्यावसायिक हे सारे आजही कोरोना नंतरच्या काळात भांबावलेले आहेत. काय करावं हे देखील त्यांना सूचत नाही. एसटीच्या गाड्या आठवड्याभरापूर्वी धावू लागल्यात, यामुळे मागील पाच महिन्यांत थांबलेला बाजार काहीसा उत्साह वाटेल या स्थितीत आला आहे. शेवटी बाजारात आर्थिक उलाढाल जोपर्यंत गती घेत नाही, तोपर्यंत कोकणातील व्यवसायाला तेजी येणार नाही.
कोकणातील जनतेचे एक वैशिष्ट्य असे आहे. इथे समाधानी वृत्ती आहे जे आहे, जे मिळाले आहे, त्यात आनंद मानत समाधानी राहायचे. हा या मातीतला गुण आहे. कदाचित यामुळे प्रगतीची चौकट ओलांडून जाऊन काही करण्याची मानसिकता असत नाही. फायद्या-तोट्याच्या अंकगणिताची मांडणी करण्यात इथला माणूस कधीच नसतो; परंतु जगभराच्या राजकारणावर ‘गजाली’ मारायला त्याला फार आवडते. रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकेचे काय चुकतंय आणि युक्रेनने कसं थांबायला हवं होतं हे सांगणारे सल्लागार कोकणातील वाडीवस्तीत सापडतील. संवेदनशील विषयांमध्येही फार भाष्य करायला कोणी जाणार नाही; परंतु आपणाला काय वाटतं. कसं वाटतंय? हे गोड बोलून इरसाल मालवणीत सांगायला पटाईत आहेत. मुंबईत किंवा उर्वरित महाराष्ट्रात चाललंय ना त्यावर फक्त एकच वाक्य बोलतील, ‘कशाक भांडतत कोणाक ठाऊक?’ ‘खुळ भांडता वझराबरोबर’ असाच सध्या सुरू आहे. अशी इरसाल प्रतिक्रिया व्यक्त करायला कोणी विसरणार नाहीत.
कोकणात आता पुढच्या वर्षी बाराही महिने पाऊस पडेल की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. राजकीय वातावरणापेक्षा नैसर्गिक वातावरणात सतत होणारे बदल कोकणातील शेतकरी, शेतमजुरांना अस्वस्थ करणारे आहेत. या वर्षीही कोकणातील कलिंगड पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची शेतीही तोट्याचीच झाली आहे. अति उष्णतेने कलिंगडाच्या बागायतीतच कलिंगड फुटली आहेत. तयार झालेली कलिंगडही बागेतच टाकून शेतकऱ्यांनी तोटा सहन केला आहे. नैसर्गिक वातावरणातील सतत होणाऱ्या बदलामुळे काहींनी या वर्षी शेती कमीच केली. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे अनेकजण कोकणात गावी आले होते. वेगवेगळ्या प्रकारची शेतीही त्यांनी केली होती. ओस पडलेल्या भातशेतीचे मळे पुन्हा एकदा भातशेतीत आलेले दिसले. दोन वर्षांपूर्वी आलेले ३० टक्के इथेच गावीच थांबले. शेती, बागायती आणि व्यवसायात त्यांनी प्रयत्न केले. दोन वर्षांत नव्याने व्यवसायात प्रगती करणे शक्यच नव्हते; परंतु मुंबईत परतून तिथेही काही मिळणार नव्हते. इथे राहून किमान घरची ‘पेज भाकरी’ तरी खाता येईल, असाच विचार या कोकणात स्थिरावलेल्यांच्या मनात आला असावा. नवीन काय व्यवसाय करायचा? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो; परंतु व्यवसायाचा हा प्रश्न घेऊन फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आता थोडं कुठे रूटिन सुरू होतय. संघर्ष तर करावा लागणारच त्याशिवाय पुढेही जाता येणार नाही आणि उभही राहाता येणार नाही. प्रयत्न करीत रहाणे एवढच आपल्या हाती आहे.
भारनियमनाचा ‘भार’ नको
देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित करण्यात आला आहे. या पर्यटन जिल्ह्यात व अखंड कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. यामुळे महाराष्ट्रात जरी भारनियमनाचे चटके जनतेला दिले जात असले, तर ती वीज गळती आणि विज चोरीचे प्रमाण कोकणात नाहीच आहे. यामुळे कोकणात भारनियमन करण्यात येऊ नये. वीजबिल थकीतचे प्रमाणही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा फारच कमी आहे. मे महिन्यात कोकणात पर्यटक येत असतात. तब्बल दोन वर्षांनंतर पर्यटन व्यवसायाला थोडीफार चालना मिळणारी आहे. असे असताना कोकणात भारनियमन होत असेल, तर त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होऊ शकतो. यापूर्वीही भारनियमनातून कोकणाला वगळण्यात आले आहे. यामुळे भारनियमनात कोकणचा समावेश करण्यात येऊ नये.