नालासोपारा (वार्ताहर) : नालासोपारा येथील खासगी वाहनतळाला लागलेल्या आगीनंतर शहरातील खासगी वाहनतळांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. शहरातील सर्व खासगी वाहनतळ अनधिकृत असून त्यांना पालिकेची कुठलीही परवानगी नाही. आग दुर्घटनेनंतर पालिका आयुक्तांनी सर्व खासगी वाहनतळांच्या तपासणीचे निर्देश दिले असून सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
नालासोपारा पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका गादीच्या दुकानाला सोमवारी संध्याकाळी आग लागली होती. या आगीमुळे लगत असलेल्या वाहनतळातील वाहनांनी पेट घेतला आणि काही क्षणांत वाहनतळातील ४० हून अधिक वाहने जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे शहरातील अनधिकृत वाहनतळ आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा मुद्दा समोर आला आहे. वसई-विरार शहरात ठिकठिकाणी खासगी वाहनतळांचे पेव फुटले असून या वाहनतळांकडून सुरक्षेच्या नियमांचे कुठलेही पालन केले जात नाही.
अनेक वाहनतळ हे पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून तर इतर वाहनतळ हे खासगी जागेत उभारण्यात आले आहेत. या वाहनतळचालकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात असते. मात्र वाहनतळ तयार करताना सुरक्षेचे कुठलेही नियम पाळण्यात येत नाही. प्रवेशाचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगळे असणे आवश्यक असते. तिथे पुरेशी मोकळी जागा, सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही असणे बंधनकारक असते.
वाहनतळामुळे इतर मार्गात अडथळा येऊ नये, ते रस्त्याच्या लगत असू नयेत, असे नियम असतात. मात्र सर्व खासगी वाहनतळच अनधिकृत असल्याने या नियमांचे पालन केले जात नसल्याचे उघड झाले आहे. उन्हाळ्यामध्ये मोटरसायकलींना आगी लागण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक असते. तथापि, शहरातील कुठल्याही खासगी वाहनतळांमध्ये अग्निसुरक्षेच्या साधनांचा अभाव असल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, सोमवारी लागलेली आगीची दुर्घटना भीषण होती. जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. हा परिसर दाटीवाटीचा असून येथे अनधिकृत टपऱ्या आणि वाहनतळ आहे. हा परिसर गर्दीचा आहे. त्यामुळे रेल्वे आणि पालिका प्रशासनाला पत्र देऊन कारवाई करण्याची सूचना करण्यात येणार आहे.
पालिका करणार तपासणी
या आग दुर्घटनेनंतर पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी शहरातील सर्व खासगी वाहनतळांचे सर्वेक्षण करून तपासण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. वाहनतळांकडून सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येईल. हे वाहनतळ अधिकृत केल्यास त्यांना सुरक्षेच्या नियमांची अंमलबाजवणी करता येऊ शकेल, याबाबत विचार सुरू आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या अनधिकृत वाहनतळांवर कारवाई करण्यात येईल.