नवीन पनवेल (वार्ताहर) : ड्रोनद्वारे होणाऱ्या मूळ गावठाणच्या सर्वेक्षणाला नैना प्रकल्पबाधीत शेतकरी उत्कर्ष समितीने विरोध दर्शवला आहे. याबाबतचे निवेदन समितीने जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, भूमि अभिलेख, तहसीलदार, बिडीओ यांना दिले आहे.
पनवेल तालुक्यातील १३८ गावांतील मूळ गावठाणाची ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. परंतु या सर्वेक्षणबाबत स्थानिक रहिवासी यांना याबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही. तथापि, स्वांतत्र्य काळापासून वाढती लोकसंख्येचा विचार करून शासनाने विस्तारीत गावठाण दिलेला नाही.
म्हणून स्थानिक रहिवाशी शेतकरी यांनी गावठाणाबाहेर व शेतावर आपल्या उदरनिर्वाहासाठी घरे, गोठे, चाळी, बिल्डीग बांधलेल्या आहेत. तसेच गावालगत असलेली गुरचरण व फॉरेस्ट या जागा स्वतंत्र काळापासून रहिवासी शेतकरी या जागेमध्ये गुरे, शेळया, मेंढ्या चरण्यासाठी व अनेक नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी याचा वापर पिढ्यानपिढ्या करत आहेत.
तरी या संबंधीत शासन व प्रशासन यांनी अगोदर सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे, असे समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तथापि, तसे न करता ड्रोनद्वारे सर्वेक्षण करत आहात. त्याला आमचा विरोध असल्याचे समितीने म्हटले आहे.
तरी मूळ गावठाणाबाहेरची घरे, चाळी, बिल्डींग त्यांना कसे सामाहून घेणार आहात, याचा अगोदर खुलासा करणे गरजेचे आहे व गुरचरण, फॉरेस्ट या जागा विस्तारीत गावठाणासाठी मिळाव्यात व सर्वेक्षणला तात्काळ स्थगिती देण्यात यावी. अन्यथा स्थानिक रहिवासी, शेतकरी, व्यावसायिक आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.