खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील मोरवंडे गावाच्या हद्दीत बिबट्याचा मुक्त संचार असून दोन बछड्यांसह रानात फिरणाऱ्या बिबट्या मादीने वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला.
मानवी वस्तीच्या जवळ येऊन बिबट्याने वासरावर हल्ला करत त्याचा फडशा पाडल्याने मोरवंडे गाव परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वासरावर हल्ला करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेली बिबट्या ही मादी असून तिच्यासोबत तिचे दोन बछडेही ग्रामस्थांना आढळू आले आहेत.
मोरवंडे गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे येथील शेतकऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आले आहे. पाळीव जनावरे, कुत्रे यांच्यावर बिबट्याने अनेकदा हल्ले केले आहेत. तसेच येथील एका शेतकऱ्यावरही बिबट्याने हल्ला केला होता. तथापि, त्या शेतकऱ्याने त्याला पळवून लावले होते.
दरम्यान, सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असून त्यासाठी शेतामध्ये जावे लागते. तथापि, बिबट्याचा वावर सर्वत्र निदर्शनास येत असल्याने शेतीच्या कामांसाठी रानात कसे जायचे, याची चिंता येथील शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे या बिबट्या व बछड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.