Tuesday, December 3, 2024
Homeक्रीडापराभवाचा वचपा कोलकाता काढणार?

पराभवाचा वचपा कोलकाता काढणार?

दिल्ली कॅपिटल्सचे आज आव्हान

ज्योत्स्ना कोट-बाबडे

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्ससमोर गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असून गेल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी कोलकाताकडे आहे. गेल्या चार सामन्यांमधील अपयशाची कोंडी फोडण्याचा प्रयत्नही या निमित्त कोलकाता करेल. कोलकाता नाईट रायडर्स सलग चार सामने हरल्यामुळे पराभवाचा ‘पंच’ टाळण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे. दिल्लीही विजयासाठी उत्सुक असून गुणतालिकेत आगेकूच करण्यासाठी त्यांना विजय गरजेचा आहे.

कोलकाताकडे सुनील नरिन आणि वरूण चक्रवर्ती अशा तगड्या फिरकीपटूंची जोडी आहे. नरिनच्या गाठीशी अनुभव असून एकहाती सामना जिंकवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. वरूण चक्रवर्तीनेही आपल्या फिरकीने प्रभावित केले आहे, तर रसलसारखा धडाकेबाज अष्टपैलू कोलकाताच्या ताफ्यात आहे. कर्णधार श्रेयस अय्यर त्यातल्या त्यात बरी कामगिरी करत आहे, पण नेतृत्वासह फलंदाजी अशा दोन आघाड्यांवर त्याला स्वत:ला सिद्ध करायचे आहे. त्यात त्याची दमछाक होत असल्याचे दिसते; परंतु दिल्ली जिंकायची असेल तर ही सारी मरगळ झटकून कोलकाताला सांघिक कामगिरी करावी लागेल.

दुसरीकडे, दिल्लीला प्रमुख गोलंदाजाची उणीव भासत असून बॉलिंग अधिक आक्रमक करण्यासाठी नॉर्टजेला प्लेइंग ईलेव्हनमध्ये परतण्याची गरज आहे. गत सामन्यात दिल्लीने कोलकाताला पराभवाची धूळ चारली होती. त्या सामन्यात दिल्लीचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी दमदार कामगिरी केली होती. दोघांनीही वैयक्तिक अर्धशतक झळकावत दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली होती. शार्दुल, अक्षर या दोघांनी फलंदाजीसह गोलंदाजीतही लक्षवेधी कामगिरी केली होती. दिल्लीसाठी हे दोघे अष्टपैलू खेळाडू महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. मात्र असे असले तरी कोलकातावरील विजयानंतर दिल्लीला फारसे सामने जिंकता आले नव्हते. त्यामुळे यापुढे स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर दिल्लीला कोलकाताचे आव्हान परतवून लावावेच लागेल.

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ४१व्या सामन्यात गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सची कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लढत होईल. आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध कोलकाताचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ विजयासाठी झुंजताना दिसतील. दोन्ही संघांचा विजय पणाला लागणार आहे.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत खेळलेले सातपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि ते आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सने शुक्रवारी त्यांचा शेवटचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळला. ज्यामध्ये दिल्ली १५ धावा कमी असतानाही २२२ धावांच्या मोठ्या आणि मोसमातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी चांगली झुंज दिली, तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सने आठ पैकी तीन सामने जिंकले आहेत आणि आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. त्यांचा शेवटचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होता आणि एकूण १५६ धावांचा पाठलाग करताना त्यांना आठ धावांनी पराभव पत्करावा लागला.

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांनी मोसमाची सुरुवात विजयाने केली. पण त्यांना तो विजयी फॉर्म कायम ठेवण्यात अपयश आले आहे. कोलकाता आणि दिल्ली दोघेही आपापल्या मागील सामन्यात पराभूत झाले असून दोन्हीही संघांना विजय आवश्यक आहे. त्यात कोलकाताची विजयी सुरुवात झाल्यानंतर सलग चार सामने हरण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. त्यामुळे दिल्लीसोबत मागच्या पराभवाचा बदला घेऊन पुन्हा विजयी पथावर येण्याची संधी त्यांच्याकडे आहे. आयपीएलमध्ये दिल्ली आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत ३१ सामने झाले आहेत, त्यापैकी केकेआरने १६, तर दिल्लीने १४ जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

वेळ : रात्री ७.३० वाजता, ठिकाण : वानखेडे स्टेडियम

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -