Sunday, July 14, 2024
Homeमहामुंबईएकमेव आधारच गेला, तर आम्ही जगू कसे व कोणासाठी : एका आईचा...

एकमेव आधारच गेला, तर आम्ही जगू कसे व कोणासाठी : एका आईचा टाहो

मुंबई (प्रतिनिधी) : मागील वर्षी कोरोनाने जगभरात थैमान घातले होते . लाखोंच्या संख्येने नागरिकांना जीव गमवावे लागले . पहिल्या लाटेत तर बेड्स, ऑक्सिजन व विविध औषधां अभावी अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत असत . कोरोना संसर्गामुळे या रोगामुळे अनेकांनी आपले वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ, ताई, आजी, आजोबा असे नातलग गमावले आहेत. कुटुंबांचा आधारच कोरोनाने हिरवल्यामुळे कित्येक कुटुंबांसमोर भविष्याचा, सध्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. अशाच एका कुटुंबाचा आधार कोरोनाने हिरावला आहे. कोरोनाने आपला एकुलता एक मुलगा- मुलगी हिरावून घेतलेल्या माता -पित्याने जगायचे कोणासाठी व कसे ? हा प्रश्न अजूनही अनेक वयोवृद्ध आई -वडिलांचा पडला आहे .

देशात कोरोनामुळे अनेक मुलांचे आई-वडील कोरोनाने हिरावल्याने अशा अनाथ झालेल्या पाल्यांना शासनाने तसेच काही सेवाभावी संस्थानी शैक्षणिक व आर्थिक मदतीच्या घोषणा केलेल्या आहेत. मात्र कोरोनाच्या महामारीत ज्या वयोवृद्ध माता- पित्याचा एकुलता एक कमावता मुलगा अथवा मुलगी मृत्यू पावली असेल अशा पालकांना अद्याप पर्यंत कोणीही आधार दिल्याचे दिसत नाही. अशीच एक घटना शहापूर तालुक्यातील वासिंद येथे वास्तव्यास असणाऱ्या सुरेश व वंदना पंडित या दाम्पत्याच्या बाबत घडली आहे.

या दाम्पत्यांनी आपला एकुलता एक मुलगा योगेश पंडित यांस अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण देऊन सिव्हील इंजिनिअर केले जिद्दीच्या जोरावर योगेशने आपली चमक दाखवून मुंबई महानगर पालिकेत मेरीट मध्ये येऊन नोकरी हि मिळवली. योगेशच्या आई-वडिलाचे स्वप्न पूर्ण झाल्याने दोघेही अतिशय आनंदात जीवन जगत होते त्यामुळे आता योगेशच्या लग्नाच्या चर्चा वेळोवेळी घरात होत असत अशातच हळद लागण्या अगोदरच योगेशला कोव्हीडचा संसर्ग झाल्याने या आधुनिक श्रावण बाळाचा मागील वर्षी दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी त्याचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला.

वर्ष उलटले तरी आई-वडील शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

आज या घटनेला एक वर्ष उलटूनही अद्याप पर्यंत योगेशच्या आई -वडिलांना मुंबई महानगरपालिकेकडून साधी तातडीचे मदत किंवा शासनाकडून सुद्धा फुटकी दमडी हि मिळालेली नाही. योगेश हा एकुलता एक मुलगा असल्याने योगेशच्या वयोवृद्ध आई -वडिलांची त्यांची देखभाल करण्यासाठी योगेशची आई वंदना हिने तिची मोठी बहीण दमयंतीच्या मुलाला त्यांच्या कडेच ठेवण्याचा निर्णय घेतला असून योगेशचा जागेवर दमयंतीचा मुलगा प्रशांत पवार यांस विशेष बाब म्हणून नोकरी देण्यात यावी अशी याचना हि वंदना हिने मुख्यमंत्र्यांकडे ई मेल द्वारे केलेली आहे. योगेशच्या आई – वडिलां सारखे असे अनेक वयोवृद्ध माता -पिता असतील त्यांच्या साठी ही शासनाने मदतीचे काही ठोस पावले उचलून त्वरित अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -