मुंबई (प्रतिनिधी) : वृद्धीमान साहाच्या अर्धशतकासह निर्णायक क्षणी राशीद खान आणि राहुल तेवतियाने केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे गुजरातने हैदराबादवर ५ विकेट राखून रोमहर्षक विजय मिळवला. या विजयामुळे गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
हैदराबादच्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला उतरलेल्या गुजरातची सुरुवात दणक्यात झाली. यष्टीरक्षक वृद्धीमान साहा आणि शुबमन गील या जोडीने गुजरातच्या धावफलकावर नाबाद अर्धशतक झळकावले. त्यानंतर शुबमनचा संयम सुटला. उम्रान मलिकने शुबमनचा त्रिफळा उडवत गुजरातला पहिला धक्का दिला. कर्णधार हार्दीक पंड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तिही फोल ठरली. यावेळीही उम्रान मलिकच धाऊन आला.
जॅन्सनकरवी पंड्याला बाद करत उम्रानने हैदराबादला दुसरा बळी मिळवून दिला. साहाने हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत गुजरातचे धावफलक खेळते ठेवले. साहाचा अडथळाही दूर करण्यासाठी उम्रानच धावला. त्याने साहाचा अप्रतिम त्रिफळा उडवत हैदराबादला तिसरे यश मिळवून दिले.
साहाने गुजरातकडून सर्वाधिक ६८ धावा केल्या. त्यानंतर राहुल तेवतियाने फलंदाजीकडे लक्ष्य केंद्रीत केले. त्याने राशीद खानच्या साथीने हैदराबादच्या गोलंदाजांना धु धु धुतले. शेवटी राशीद खाननेही कमालीची फलंदाजी करत शेवटच्या चेंडूवर अप्रतिम षटकार ठोकत गुजरातला शेवटी अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. राहुल तेवतियाने २१ चेंडूंत नाबाद ४० धावा केल्या, तर राशीद खानने ११ चेंडूंत नाबाद ३१ धावांची विजयी खेळी खेळली.
राशीद खान आणि राहुल तेवतिया यांच्या तुफानी फलंदाजीमुळे गुजरातने हैदराबादवर रोमहर्षक सामन्यात निसटता विजय मिळवला. या विजयामुळे गुजरातनेही गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. गुजरातने ८ सामन्यांपैकी ७ सामने जिंकत १४ गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे. गुजरातने यंदाच्या हंगामात केवळ एका सामन्यात पराभव पत्करला आहे.
तत्पूर्वी हैदराबादचा कर्णधार आणि सलामीवीर केन विलियम्सनने गुजरातविरुद्ध निराशा केली. अवघ्या ५ धावा करत विलियम्सन माघारी परतला. राहुल त्रिपाठीलाही फार काळ मैदानात थांबता आले नाही. त्यानंतर सलामीवीर अभिषेक शर्मा आणि आयडेन मार्क्रम यांनी हैदराबादच्या फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. या जोडीने हैदराबादच्या धावांचा वेग वाढवला. अभिषेक शर्माने ४२ चेंडूंत ६५ धावा केल्या. तर मार्क्रमने ४० चेंडूंत ५६ धावांचे योगदान दिले. तळात शशांक सिंगने धडाकेबाज फलंदाजी करत ६ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांमध्ये हैदराबादच्या धावसंख्येची गती चांगलीच वाढली.
२० षटकांअखेर हैदराबादच्या खात्यात ६ फलंदाजांच्या बदल्यात १९५ धावा झाल्या होत्या. अभिषेक शर्मा, मार्क्रम आणि शशांक सिंग वगळता हैदराबादचे अन्य फलंदाज गुजरातविरुद्ध अपयशी ठरले. गुजरातच्या मोहम्मद शमीला बळी मिळवण्यात यश आले असले तरी तो धावा रोखू शकला नाही.
शमीने ४ षटकांत ३९ धावा देत ३ विकेट मिळवले. यश दयालने कमालीची गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत अवघ्या २४ धावा देत १ विकेट मिळवली.