भाईंदर (प्रतिनिधी) : मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे दोन वेळा नगरसेवक राहिलेले तथा माजी सभापती चंद्रकांत मोदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेत २००२ आणि २००७ या दोन टर्म मध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते. तसेच प्रभाग समिती सभापती म्हणून राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत मोदी यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. मीरा रोड येथील शांतीनगर भागात त्यांचे वर्चस्व असून गुजराती समाज तसेच स्वामी नारायण संप्रदायात त्यांना मानणारे अनेक लोक आहेत.
मीरा रोडच्या विकासकामात त्यांचा मोठा वाटा आहे. मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी पुष्पगुच्छ देऊन मोदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मीरा-भाईंदर भाजपचे जिल्हाध्यक्ष रवी व्यास, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी आदी उपस्थित होते.