मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही तिसरी लाट येऊन गेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातही कोरोना पूर्णपणे नाहीसा झाला आहे असे चित्रं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कॉलेजेसही ऑफलाईन पद्धतीनं सुरु झाले आहेत. मात्र गेली दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतल्यामुळे ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध होता.
मात्र आता राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. उच्च शिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांच्या बैठकीच्या आधीच नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा आढावा घेतला. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केली आहे. बैठकीमध्ये सर्व कुलगुरूंनी तयारी दर्शविल्याचेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
राज्यात ऑफलाइन परीक्षा घेण्याचे ठरले असताना दोन दिवसांपूर्वी विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेण्याचे परीक्षा मंडळाच्या बैठकीत ठरविले. मात्र, त्याबाबत अद्याप नोटीफिकेशन काढण्यात आलेले नाही. आता ऑफलाइनचा निर्णय आल्याने पुन्हा एकदा या निर्णयावर विचार करावा लागणार आहे. त्यामुळे या निर्णयावर चर्चा करण्यासाठी विद्यापीठाला विद्वत परिषदेची बैठक बोलवावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांना होणार त्रास राज्यातील काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षांचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्साह आला होता. मात्र काही दिवसातच परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असा निर्णय जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात काही विद्यापीठांनी दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे अजूनच संभ्रम वाढला आहे. ऑनलाईन शिक्षण सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला होता. मात्र दोन वर्षांनंतर थेट ऑफलाईन परीक्षा देताना वेळ वाढवून द्यावी ही मागणी विद्यार्थ्यांकडून येत होती. यानंतर परीक्षांसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुलगुरूंच्या बैठकीत उच्च शिक्षण मंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.