सावंतवाडी (प्रतिनिधी) : औषध समजून विषारी द्रव्य प्राशन केलेल्या केसरी येथील एका युवतीचे मंगळवारी सकाळी निधन झाले. चैताली वासुदेव सावंत (२२, रा. खालची वाडी) असे त्या युवतीचे नाव आहे.
चैतालीवर गेले दहा दिवस येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत तिचे काका संतोष सावंत यांनी येथील पोलीस ठाण्यात खबर दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद याप्रकरणी करण्यात आली आहे.
संबंधित युवतीने दि. १६ एप्रिल रोजी औषध समजून विषारी द्रव्य प्राशन केले होते. यानंतर तिला उलट्या होऊ लागल्याने तिला नातेवाईकांनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी तिची तपासणी केली असता तिने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे उघड झाले. त्यानंतर तिच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयातच दहा दिवस उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.