कीर्ती केसरकर
नालासोपारा : उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असतानाच मागील काही दिवसांपासून वसई-विरारमधील विविध ठिकाणच्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अधूनमधून वीज गायब असल्याने याचा मोठा फटका हा नागरिकांना बसू लागला आहे.
वसई-विरार शहरात दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत असून वीज ग्राहकांची संख्या ही वाढली आहे. असे असले तरी सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यातच वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत.
दिवसातून अनेकदा वीज नसल्याने कामकाज करण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत. तसेच वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणांमध्येही बिघाड होऊन नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच आयत्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला की गृहिणींना मिक्सरऐवजी पाटा-वरवंट्याचा आधार घेऊन तसेच संध्याकाळचा स्वयंपाक टिमटिमत्या मेणबत्त्यांखाली करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विरार (प.), वटार, कोफराड, नाळे, आगाशी, बोळींज यांसह इतर भागांतील वीजपुरवठा खंडित होत असल्याचे आम आदमी पार्टीचे जॉन परेरा यांनी सांगितले. येत्या दहा दिवसांत वीजपुरवठा खंडित होणे थांबले नाही तर आपणास जनतेच्या प्रखर आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशाराही परेरा यांनी महावितरणला दिला आहे.
समस्यांकडे दुर्लक्ष
वीजविषयक समस्या सोडवण्याकडे वीजवितरणचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. वीजपुरवठा खंडित होणे व कमी दाबाचा पुरवठा यामुळे नवीन स्विचिंग केंद्र मंजूर केले आहे. तसेच विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, अनेक ठिकाणी वितरण व्यवस्थेची दुरवस्था, जुनी झालेली रोहित्रे, डीपी बॉक्स, कंडक्टर हे सर्व जुने झाले आहेत. अशा विविध प्रकारच्या उपाययोजनांकडे महावितरणचे दुर्लक्ष झाल्याने विजेच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.