सिंधुदुर्ग (हिं.स.) : कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौकामधील कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या जागेमध्ये असलेले वडाचे झाड तोडण्याचा घाट काही बिल्डर्स लॉबीने घातला आहे. या वडाच्या झाडाची कत्तल होऊ नये अन्यथा भाजपच्यावतीने जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा कुडाळ भाजपच्या नगरसेवकानी दिला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना त्या आशयाचे निवेदन आज देण्यात आले.
कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील वडाचे झाड गेली अनेक वर्ष उभे आहे. या वडाच्या झाडामुळे कोणत्याही घराला तसेच व्यावसायिकांना त्रास झालेला नाही. या वडाच्या झाडामुळे कोणत्याही प्रकारची यापूर्वी वित्त किंवा जीवित हानी झालेल्याची घटना नाही. तोक्ते चक्रीवादळ होऊन गेले, मात्र या वडाच्या झाडाची फांदीसुद्धा तुटलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये काही बिल्डर लॉबीला हे झाड तोडले तर आवश्यक असलेला रस्ता निर्माण करता येणार आहे. त्यामुळे या झाडाची कत्तल करण्याचा घाट या लॉबीने घातला आहे.
तसेच याठिकाणी गटार काढून सांडपाणी सोडण्याचा ही विचार या लॉबीचा आहे. हे झाड शासकीय म्हणजेच ग्रामीण रुग्णालयाच्या अस्थापनेच्या जागेत आहे. त्यामुळे हे झाड तोडण्यासाठी कोणत्याही प्रकारे परवानगी देण्यात येऊ नये, अन्यथा भाजपच्यावतीने हे झाड वाचवण्यासाठी जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन ओरोस येथील जिल्हा रुग्णालय येथे देण्यात आले.