मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यातील भाषणानंतर उत्तर सभा घेत राज्य सरकार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टिका केली. त्यानंतर, १ मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. राज यांच्या घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले. आता, भाजपकडूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील सोमय्या मैदानावर ही सभा होत असून बुस्टर डोस, असे नाव या सभेला देण्यात आले आहे.
राज ठाकरेंनी हनुमान चालिसा वाजवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचा आग्रह धरला. त्या, वादातून राणा दाम्पत्याला अटकही झाली. या साऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेची घोषणा केली होती. त्यानंतर, आता भाजपनेही १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मोठ्या कार्यक्रमात फडणवीसांच्या जाहीर सभेची घोषणा केली आहे. मुंबई भाजपचे प्रमुख अॅड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
एक रंगारंग उच्च प्रतिचा सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा आनंद घेण्यासाठी भाजपकडून होत आहे. मुंबई अन् महाराष्ट्राची संस्कृती विशद करणारा हा सोहळा असेल. या सोहळ्यास मुंबईतील शक्तीकेंद्र प्रमुख, बुधप्रमुख आणि हजारो कार्यकर्ते येथे उपस्थित राहतील. या कार्यक्रमात, देवेंद्र फडणवीस यांची बुस्टर डोस सभा होणार आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले. शिवसेना आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस फडणवीस यांच्या या सभेतून मिळणार असल्याचेही ते म्हणाले.