ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे परिवहन सेवेमध्ये ८१ इलेक्ट्रिक बसेस विकत घेण्याबाबतचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात मार्गी लागल्यानंतर आता या बसेस परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल होण्याचा मार्ग अंतिम टप्प्यात आला असून पहिल्या टप्प्यात ४० बसेस घेतल्या जाणार आहेत. परिवहन विभागाने काढलेल्या निविदेला प्रतिसाद देत दोन संस्थांनी यात पुढाकार घेतल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली.
पालिका आणि परिवहनच्या माध्यमातून या बसेसची ट्रायल शहरात सुरू झाली आहे. अधिकचे अंतर धावेल किंवा बॅटरी बॅकअप जास्त असेल, अशा कंपनीकडून बसेस विकत घेतल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परिवहनच्या ताफ्यात १०० इलेक्ट्रिक बसेस घेण्याबाबत ४ वर्षांपूर्वी प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या काळात अवघी एकच बस ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाली होती. त्यातही ती बस अवघ्या काही दिवसांत नादुरुस्त झाली. केंद्र सरकारने १५व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी महापालिका आणि नगरपालिका यांना विविध उपाययोजना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असतो.
या निधीतूनच ज्या महापालिका आणि नगरपालिकेची लोकसंख्या १० लाखांहून अधिकची आहे, अशा शहरांमध्ये प्रदूषण कमी व्हावे, हवेचा दर्जा सुधारावा, यासाठी त्या शहरात इलेक्ट्रिक बसेस चालवून हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करावी या हेतूने त्यांना निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार पालिकेला ८१ बसेस घेण्यासाठी ३८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
आता या बसेस खरेदी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ८१ बसेसपैकी ९ मीटरच्या ५६ आणि १२ मीटरच्या २५ बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गावर नालासोपारा, बोरिवली या मार्गावर १२ मीटर आणि शहरातील अंतर्गत मार्गावर ९ मीटरच्या बसेस चालविल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान आता परिवहनने काढलेल्या निविदेला प्रतिसाद देत दोन कंपन्यांनी यात सहभाग घेतला आहे. त्यानुसार या बसेस परिवहनच्या ताफ्यात घेण्यापूर्वी त्या बसेसचा बॅटरी बॅकअप व किती किलोमीटर चालू शकतात, याची चाचपणी परिवहनने सुरू केली आहे. आयुक्तांनी या बसमध्ये बसून याची खातरजमा करून घेतली. त्यानुसार ज्या बसेसची गुणवत्ता चांगली असेल, त्या कंपनीकडून बसेस घेतल्या जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
येत्या महिन्यात या बसेस परिवहनच्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४० बसेस घेतल्या जाणार असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरीत बसेस घेतल्या जाणार आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.