शैलेश पालकर
पोलादपूर : तालुक्यातील महाडलगतच्या ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक लोकवस्त्यांना जोरदार तडाखा दिल्याने आर्थिक हानी झाल्याचे दिसून आले. लोहारे, तुर्भे तसेच सवाद धारवली सप्तक्रोशी भागातील वावे याठिकाणी इमारतींचे नुकसान झाल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. सुदैवाने कोठेही मनुष्यजीवित हानी झाली नाही.
पोलादपूर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून येऊन सोसाट्याचा वारा सुटला आणि वादळी वाऱ्याने धुळीचे लोट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटच्या रस्त्यावरून उधळले गेले. यामुळे काही काळ वाहनांना कमी वेग ठेऊन प्रखर प्रकाश झोतामध्ये सायंकाळी पाच वाजल्यानंतर वाहने चालवावी लागली.
याचदरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत शेलार ढाब्याच्या नवीन आकर्षक इमारतीची एक भिंत वादळी वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने कोसळली. यावेळी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या तीन मोटारसायकलींवर भिंतीतील जांभा दगड पडल्याने मोटारसायकलींची हानी झाली. यावेळी तुर्भे बुद्रुक भिकू गणपत पवार यांचे राहते घराचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले, तर तुर्भे बुद्रुक मंदिर पत्र्याचे नुकसान झाले. सवाद धारवली सप्तक्रोशी विभागातही वावे गावात घराचे पत्रे उडाल्याच्या घटनांनी अनेकांचे आर्थिक नुकसान ओढवले आहे.
पोलादपूर तहसील कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार तालुक्यात वादळीवाऱ्यामुळे घरे व इमारतींचे नुकसान झाले असले तरी कोठेही मनुष्याला इजा अथवा जिविताची हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.