मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते मंगळवारी ‘गो-लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दिनांक १० जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृह येथे काढण्यात येणार आहे.
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या येथील शिवगड या शासकीय निवासस्थानी आयोजित गो-लाइव्ह कार्यक्रमाला गृहनिर्माण औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती संजय केणेकर, म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, म्हाडाचे वित्त नियंत्रक दिग्विजय चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा जायभाये-धुळे, औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, संगणक कक्षाच्या प्रमुख सविता बोडके, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डिग्गीकर यांच्या हस्ते सोडतीची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता नियमावली, मार्गदर्शक सूचना या पुस्तिकेत नमूद करण्यात आल्या आहेत. ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छुक अर्जदारांनी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन औरंगाबाद मंडळातर्फे करण्यात आले आहे.
दिनांक २६ एप्रिलपासून सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराला अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. अर्ज नोंदणीची प्रक्रिया दिनांक २४ मे, २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक २५ मे, २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत आहे.
अनामत रकमेच्या ऑनलाइन स्विकृतीकरिता दिनांक २६ मे, २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत असून बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा दिनांक २७ मे, २०२२ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक २ जून, २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे.