Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीचालिसावरून महाभारत …

चालिसावरून महाभारत …

सुकृत खांडेकर

येत्या ३ मेनंतर म्हणजे इदनंतर मशिदींवर बेकायदा लाऊडस्पिकर वाजवले जाणार असतील, तर तेथे हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील जाहीर सभांतून दिला आणि त्याचे पडसाद देशभर उमटले. लाऊडस्पिकर लावण्यासंबंधी जे काही सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, त्याचे ठाकरे सरकारने महाराष्ट्रात तंतोतंत पालन करावे अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे. केवळ अल्पसंख्याकांच्या मतांचे लांगुलचालन करण्यासाठी मशिदींवर लाऊडस्पिकर चालू राहणार असतील, तर मनसे त्या विरोधात हनुमान चालिसा घेऊन पठण करील हाच त्यांच्या इशाऱ्यामागे हेतू होता.

राज यांच्या सभांना प्रचंड गर्दी होतीच. पण सर्व मराठी वृत्तवाहिन्यांनी त्याचे थेट प्रक्षेपण केल्याने त्यांच्या सभेला मोठी प्रसिद्धी मिळाली. राज यांच्या इशाऱ्यानंतर सरकारही गडबडले. राज हे हिंदुत्ववादी अजेंडा राबवू लागले आहेत. राज यांनी त्यांच्या पक्षाच्या झेंड्यातून हिरवा रंग काढून टाकला आहे, राज पुन्हा भाजपचा अजेंडा राबवू लागले आहेत, अशी टीका महाआघाडीने सुरू केली. राज ठाकरे हा भाजपचा पोपट आहेत इथपासून मनसे ही भाजपची सी टीम आहे इथपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने मनसेवर तोंडसुख घेतले. राज यांनी हनुमान चालिसाचे नाव घेतले, खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिलाचे पठण करण्याचा इशारा दिला. आपल्या घरात बसून महाआघाडी सरकारला हादरे देणाऱ्या राणा दाम्पत्यांवर पोलिसांनी तातडीने राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले आणि दोन दिवसांच्या राजकीय रणधुमाळीत किरीट सोमय्या व मोहीत कंबोज या भाजप नेत्यांवर शिवसैनिकांकडून हल्लेही झाले. हनुमान चालिसाच्या घोषणेने राज्यातील वातावरण एवढे तापेल असे कुणाला वाटले नव्हते. चालिसासाठी कोणी प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन केले नव्हते. राणा दाम्पत्यानेही मातोश्रीसमोर पण आंदोलन करणार असे म्हटले नव्हते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे पूर्व कलानगर येथील निवासस्थानासमोर चालिसा वाचणार असल्याची घोषणा त्यांना चांगलीच महागात पडली. मातोश्रीवर कोणी चाल करून येणार म्हटल्यावर शिवसैनिकांचे जथेच्या जथे तिथे गेले. राणा दाम्पत्याच्या नावाने तिथे शिमगा केला गेला.

बंटी-बबली हाय हाय अशा घोषणा दिल्या गेल्या. मातोश्रीबाहेर कित्येक वर्षे पोलीस बंदोबस्त आहे. उद्धव ठाकरे वर्षावर मुक्कामाला गेले. पण मातोश्रीवर मुंबई पोलीस, राज्य राखीव दलाचे पोलीस, इमर्जन्सी रिस्पाॅन्स टीम अशी सुरक्षा पथके सदैव तैनात आहेतच. पोलिसांच्या गाड्यांचे मातोश्रीसमोर कडे असताना शिवसैनिकांना झेंडे घेऊन तिथे का जावे लागले? दोन दिवस ठिय्या आंदोलन का करावे लागले? मुंबई पोलीस व सुरक्षा दलावर शिवसेनेचा विश्वास नाही का? आपल्या घरातील माणूस मुख्यमंत्री आहे, मग मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची अशी घोषणा मातोश्रीबाहेर देण्याची पाळी का यावी? खासदार संजय राऊत रोज मीडियासमोर शिवसेनेची बाजू मांडत असतात. त्यांनी शिवसेना भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी शेकडो शिवसैनिक सेना भवनबाहेर घोषणा देत तासनतास उभे होते. मातोश्री असो की सेना भवन, शेकडो तरुण तासन तास नि दोन दोन दिवस जमतात त्यांना कामधंदा, नोकरी, रोजगार काहीच काम नाही का? मातोश्रीसमोर चालिसा पठणाचा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता, पण त्यांच्याशी सरकारच्या वतीने कोणी संवादही साधला नसावा. मातोश्रीच्या नादाला लागायचे असेल, तर अगोदर गोवऱ्या स्मशानात रचून या, अशी धमकी शिवसेना नेत्याने चॅनेलवरून दिली. महाआघाडी सरकारची वाटचाल याच मार्गाने चालू आहे का? मोहित कंबोज यांच्या गाडीवर कलानगरला तर खार पोलीस ठाण्याच्या बाहेर किरीट सोमय्या यांच्या मोटारीवर दगडफेक झाली. तुमच्या (भाजप) झुंडशाहीला सेनेने झुंडशाहीने उत्तर दिले, तर मिरच्या का झोंबतात? गुन्हेगारांवर देशात असे दगड पडतातच. लोकांच्या मनात संताप निर्माण झाला असेल म्हणूनच दगड पडला असेल… अशी भाषा संजय राऊत यांनी वापरून अशा हल्ल्यांचे एकप्रकारे समर्थन केले.

चोवीस तास पोलीस बाजूला ठेवा, मग कसे उत्तर द्यायचे हे आम्हाला चांगले समजते, असे नितेश राणे यांनी आव्हान दिले. स्वत: संजय राऊत आपला हरेन पांड्या होईल, असे बोलून दाखवत आहेत, तर आपला मनसुख हिरेन होण्याचा प्रयत्न होता असे उद्गार किरीट सोमय्या यांनी काढले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख व नबाब मलिक यांना अगोदरच केंद्रीय तपास यंत्रणांनी जेलमध्ये टाकले आहे. आघाडीच्या अनेक नेत्यांची इन्कम टॅक्स-ईडीकडून चौकशी चालूच आहे. अनेकांचे फ्लॅट, जमिनी, मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

त्यामुळे महाआघाडी विरुद्ध भाजप अशा संघर्षाला चालिसाच्या निमित्ताने धार चढली आहे. राज्यात कायदा-सुव्यस्था आहे की नाही असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे.

देशभरातील हिंदी वृत्तवाहिन्यांनी तर बजरंगबली, महाराष्ट्र में खलबली अशा ब्रेकिंग न्यूज देऊन दिवसभर चालिसावरून महाभारत चालवले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राजकीय सूडनाट्य किती शिगेला पोहोचले आहे हे जनतेला बघायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत आले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजशिष्टाचार म्हणून त्यांच्या स्वागतालाही गेले नाहीत. षण्मुखानंद सभागृहातील त्या अविस्मरणीस समारंभास उपस्थितही राहिले नाहीत. नेमकी तीच वेळ निवडून ते त्यांच्या परिवारासह मातोश्रीसमोर दोन दिवस घोषणा देणाऱ्या कट्टर शिवसैनिक असलेल्या ८० वर्षांच्या आजीला भेटायला परळला भोईवाड्यात गेले. दोन दिवस फायर आजी, झुकेंगी नही असे तिचे मीडियातून कौतुक चालू होते. आजीनेही डरेंगे नहीं, झुकेंगे नही हा पुष्पा फेम डायलाग ठाकरे परिवाराला म्हणून दाखवला.

आजी आयुष्यभर शिवसैनिक आहेत. आयुष्यभर दहा बाय दहाच्या खोलीत राहत आहेत. शिवसेना झिंदाबाद घोषणा देण्यात तिचे आयुष्य गेले. पण एका खोलीतून मोठ्या घरात गेली नाही. तिचा नातू रिकामटेकडा शिवसैनिक आहे. नातवाला काम नाही, नोकरी नाही…. म्हणतात झुकेंगे नही……

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -