ऑनलाइन प्रेम! महिलांनी बाळगा सावधगिरी

मीनाक्षी जगदाळे


आज-काल अॅड्रॉइड मोबाइल, लॅपटॉप व त्यामार्फत सोशल मीडियामधील विविध अॅप्लिकेशन वापरत नाहीत, असे खूपच कमी लोक असतील. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आज-काल प्रत्येक जण स्मार्टफोनशी चांगलेच परिचित आहेत. मोबाइल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला असून, महिला देखील मोठ्या प्रमाणात दैनंदिन, कार्यालयीन कामकाजासाठी, व्यावसायिक कारणांसाठी, करमणुकीसाठी विविध अॅप्लिकेशन वापरताना दिसतात. टेक्नॉलॉजी जशी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे तसेच सोशल मीडियावर होणारे प्रेम देखील प्रचंड वेगाने वाढत आहे. ऑनलाइन प्रेम करण्याचा नवा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. वास्तविक सामाजिक माध्यमातून आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, माहिती होतात व या प्लॅटफॉर्मचा सुयोग्य वापर जर करता आला, तर आपण खूप काही आत्मसात करू शकतो. अनेक सकारात्मक विषय, व्यवसाय, शिक्षण, सामाजिक कार्य, आध्यात्मिक माहिती, आरोग्य यांसारख्या असंख्य गोष्टी आपल्याला समाज माध्यमातून मिळतात. महिला तर अतिशय उत्साहाने नवीन नवीन अॅप्लिकेशन शिकून, त्याबद्दल माहिती घेऊन ती हिरीरीने वापरतात. महिला कुतूहलापोटी अनेक व्हाॅट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा समूहात सामील होतात. मोठ्या प्रमाणात माहितीचे आदानप्रदान, गप्पा, फोटो, व्हीडिओ एकमेकांना शेअर करून सगळ्यांशी आपण कनेक्ट आहोत, अपडेटेड आहोत, आपल्याला समाजातील अनेकजण ओळखतात, आपल्याशी संवाद साधायला उत्सुक असतात, आपण सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आणि ॲक्टिव्ह आहोत याचा महिलांना सार्थ अभिमान वाटतो.


अशा अॅप्लिकेशनमधील ग्रुप्सविषयी जर बघितले तर, आपण जॉईन केलेल्या किंवा आपल्याला ॲड केल्या गेलेल्या ग्रुपमधील सर्व व्यक्तींचा आपल्याला परिचय नसतो. फार फार तर ग्रुप ॲडमिनला आपण थोडं फार ओळखत असतो. अनेक ग्रुपमध्ये समूहातील सदस्यांनी त्यांचे नाव, गाव त्यांच्या नंबर समोर ठेवलेले नसते. त्यामुळे कोण कोण समूहात आहे याची बेसिक कल्पनासुद्धा आपल्याला नसते. कोणाचेही बॅकग्राऊंड, ठावठिकाणा उद्योग, व्यवसाय आपल्याला माहिती नसतो. अशा परिस्थितीतही महिला खूपच बेसावध पद्धतीने ग्रुपवर वावरताना दिसतात. काही वेळा ग्रुपमध्ये असलेले काही पुरुष सदस्य महिला सदस्यांना विनाकारण वैयक्तिक मेसेज, फोन करताना दिसतात. यावेळी महिला कोणत्या पद्धतीने, कसा प्रतिसाद देते यावर पुढील कथानक अवलंबून असते. आपण पाहतो की, आज-काल अनेक प्रेम कथांचा जन्म हा सोशल मीडिया मधूनच होत आहे. प्रेमाच्या आणि प्रेम करण्याच्या संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल आताशा झालेला दिसतो.


सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या महिलांना वैयक्तिक मेसेज, फोन केले जातात, त्यांच्याशी ओळख वाढवली जाते. त्यांच्या फोटोचे कौतुक केले जाते आणि त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवायला सुरुवात होते. वैयक्तिक माहितीची देखील देवाण-घेवाण होते. सामाजिक माध्यमातून भेटणारी, ओळख झालेली प्रत्येक नवीन व्यक्ती चुकीची किंवा त्रासदायक नक्कीच नसते. पण काही वेळा चुकीच्या लोकांना प्रतिसाद दिला गेल्यास, त्यांचा हेतू लक्षात न आल्यास, अथवा जास्तच विश्वास ठेवला गेल्यास महिलांना स्वतःच्याच अशा उतावीळपणे वागण्याचा त्रास सहन करावा लागतो.


आपली जी स्वप्न, जे विचार, ज्या अपेक्षा प्रत्यक्ष जीवनात पूर्ण होत नसतात त्या पूर्ण करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यात काही चुकीचे नाही, प्रत्येकाचे स्वतःच असे एक मन असते. ज्यामध्ये तो स्वतःच्या फॅनटसी पूर्ण करण्याची स्वप्न पाहत असतो. आज-काल मोबाइलमुळे, अनेकांच्या संपर्कात राहता येत असल्यामुळे, नवीन नवीन अॅप्लिकेशनमार्फत संवाद साधणे सोपे झाल्यामुळे आपली स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक जण धडपडताना दिसतोय. सामाजिक माध्यमातून जी आभासी दुनिया आपल्याला खुणावत असते तिच्या किती आधीन जायचं हे ठरवणं प्रत्येकाला जमेलच असे नाही.


महिला मुळातच भावनाप्रधान असल्याने त्यांना या स्वरूपाच्या आभासी प्रेमाची पटकन भुरळ पडते. महिलांना हे समजत नाही की, जरी त्यांनी अशा प्रकारच्या ऑनलाइन प्रेम प्रकरणात भावना गुंतवल्या असतील तरी त्या कोणत्या मर्यादेपर्यंत असाव्यात? चॅटिंग करताना आपली तसेच समोरच्याची भाषाशैली, भाषेचा दर्जा किती घसरू द्यावा, समोरून चुकीच्या व्हीडिओ अथवा फोटोची मागणी झाल्यास ती पूर्ण करावी का? ज्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष ओळखत नाही, भेटलेलो नाही किंवा अतिशय अल्प परिचय ज्या व्यक्तीबाबत आपल्याला आहे, त्याला आपले स्वतःचे अश्लील फोटो अथवा व्हीडिओ अथवा आपली वैयक्तिक माहिती अतिशय कमी कालावधीत कमी परिचयातील पुरुषाला पाठवणे कितपत योग्य आहे? समोरील व्यक्ती याचा गैरवापर करेल, ब्लॅकमेल करेल याचा विचार तर कधी करणार? हा विषय तर खूपच वेगळा आहे व यावर आपण सध्या तरी बोलणार नाही आहोत.


हे सगळे करत असताना महिला मात्र समोरच्या व्यक्तीशी चॅटिंगवर केलेले हितगुज खरे समजून आपल्या सर्व भावना, विश्वास, प्रेम समर्पित करून त्याच्या ऑनलाइन मागण्या पूर्ण करीत असते. आभासी आणि ऑनलाइन प्रेमही, महिला समरस होऊनच करते. कारण ती त्या व्यक्तीपासून शरीराने दूर असली तरी मनाने पूर्ण गुंतलेली असते. पुरुष मात्र अशा प्रेमाला किती गांभीर्याने घेतात? त्यांच्या भावना तितक्यात समर्पित असतात का? की केवळ काही मिनिटांसाठी असे फोटो, व्हीडिओ एन्जॉय करून ते विसरून जातात. अशा प्रकारचे सामाजिक माध्यमातून केले गेलेले स्त्री - पुरुषाचे प्रेम, पुरुषाने महिलेकडे याच माध्यमातून केलेल्या विविध मागण्या, भेटण्याचे, फिरण्याचे केलेले प्लॅन, दिलेली वचने किती तात्पुरती आणि पोकळ असतात हे समुपदेशनाला आलेल्या अनेक प्रकरणांमधून लक्षात येते. सामाजिक माध्यम, त्यातून निर्माण झालेली प्रेमप्रकरणे आणि महिलांची झालेली भावनिक कोंडी अथवा हार ही गुंतागुंतीची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे.


meenonline@gmail.com

Comments
Add Comment

निकोबार द्वीप समूहाचा व्यूहात्मक विकास

केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेट समूहाचा विकास करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. या बेटाचे भौगोलिक स्थान लक्षात

बालेकिल्लाही भाजप विचारांचा होतोय

तरुण मतदारांच्या अपेक्षा रोजगार, शिक्षण व उद्योजकतेशी निगडित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी अजूनही पारंपरिक

विद्युत वाहनांस प्रोत्साहन

मुंबईतील सूक्ष्मकण प्रदूषण (पीएम २.५ आणि पीएम १०) हा वायू प्रदूषणाचा मुख्य घटक आहे, जो सार्वजनिक आरोग्यासाठी

विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार?

विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन अध्यापकांनी योग्य मार्गदर्शन करणे

नव्या दोस्तीची अमेरिकेला धास्ती

प्रा. जयसिंग यादव डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीमुळे चीन, भारत, रशिया अमेरिकेची व्यूहनीती झुगारून एकत्र आले.

चौकटीपलीकडचा शिक्षकी पेशा...

आधुनिक युगात शिक्षकांची भूमिका अधिक आव्हानात्मक झाली आहे. सध्याच्या तंत्रबदलत्या युगात शिक्षणाच्या कल्पना