जव्हार (वार्ताहर) : आधुनिक शेती व पशुपालन हा व्यवसाय शहारात आणि ग्रामीण भागात चांगल्या जोमाने सुरू आहे. वातावरणात बदल, महागाईचे चटके शेतकऱ्यांना चांगल्याच संकटात टाकत आहेत. पशुखाद्य वाढल्याने पशुपालक मोठ्या अडचणीत सापडला आहे. दूधपुरवठा करून भाव वाढवू शकत नसल्याने शेतकऱ्यांची तारेवरची कसरत झाली आहे.
जनावरांना दिल्या जाणाऱ्या पूरक खाद्याचा भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतित आहेत. याउलट दुधाचा भाव वाढत नाही. मात्र पशुखाद्याचे दर वाढत चालल्याने पशुपालन करावे की नाही, असा प्रश्न पशुपालक, शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालन करतात. अनेकजण दुग्धव्यवसायास पसंती देतात. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम होण्यास दुग्धव्यवसाय कष्टाचा असला तरी फायदेशीर आहे. या व्यवसायातून आर्थिक भर पडण्यास मदत होते. तथापि, दुधाळ जनावरांना व्यवस्थापन करताना खाण्यावर विशेष लक्ष द्यावे लागत आहे.
समतोल व पूरक खाद्य द्यावे लागते. त्यातच काही महिन्यांपासून पशुखाद्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. २०२० मध्ये ढेपचे पोते १४०० रुपये होते. त्याची किंमत २०२२ मध्ये १९०० ते २००० रुपये झाली आहे. सुग्रास १२०० वरून १५०० ते १८०० रुपयांवर गेला आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर वाढत असताना दुसरीकडे दुधाचा भाव वाढत नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पशुखाद्य महाग झाल्याने दूध व्यवसाय करणे चिंतामय झाले होते. खाद्य महागले, पण दुधाचे दर वाढले नसल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. – आकाश शिरसाट, दूध व्यापारी, जव्हार