पनवेल (प्रतिनिधी) : महापालिकेतील विविध विभागांतील दंड, करांच्या पावत्या आता शंभर टक्के फक्त पॉस मशीनच्या माध्यमातून घेतले जात आहेत. छापील पावती पुस्तके पूर्णत: बंद करण्यात आली असून पारदर्शक कारभाराच्या दिशेने महापालिकेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
आज झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत पॉस मशीनचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून आयुक्तांनी महापालिकेतील पावती पुस्तकांचा वापर बंद करून पॉस मशीनच्या माध्यमातून दंड, करवसुली करावी याकडे जातीने लक्ष घातले होते. आयुक्तांनी सातत्याने यामध्ये येणाऱ्या त्रुटींमध्ये सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करून प्रोत्साहन दिले.
सध्या प्रभाग समिती, रेाज बाजार, स्वच्छता मार्शल्स पॉस् मशीनच्या माध्यमातून दंड, करवसुली करत असून छापील पावती पुस्तकांच्या माध्यमातून करण्यात येणारी वसुली पूर्णत: बंद करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेला बँक ऑफ इंडियाचे सहकार्य लाभले असून वर्ल्ड लाइन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ८८ पॉस मशीन्सच्या माध्यमातून सर्व कर व दंड वसुली चारही प्रभाग समितींमध्ये केली जात आहे. लेखा विभागाच्या या स्तुत्य कामगिरीबद्दल मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे व लेखा विभागाच्या संपूर्ण टीमचे आयुक्तांनी अभिनंदन केले.
तसेच नागरिकांनी महापालिकेचा कोणताही दंड, कर देताना छापील पावतीचा स्वीकार न करता पॉस मशीनद्वारे मिळणाऱ्या पावतीचीच मागणी करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. याबरोबरच महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या आणि नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन ही कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी आज झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक संचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखा परीक्षक विनयकुमार पाटील, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे यांच्यासह पालिकेतील सर्व विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.