मालवण (प्रतिनिधी) : मालवण-कसाल मुख्य रस्त्यावर सावरवाड येथील पोलिसांच्या चेक पोस्ट इमारतीवर गोवा येथील पर्यटकांची अर्टिगा गाडी धडकली. हा अपघात सोमवारी सायंकाळी घडला. सुदैवाने या अपघातात गाडीतील पर्यटक बचावले आहेत. मात्र या अपघातात इमारतीचे व गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, गोवा येथील पर्यटक मालवण येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. हे पर्यटक आपल्या अर्टिगा गाडीतून मालवणहून गोव्याला परतीच्या प्रवासाला निघाले होते. मालवण कसाल मार्गावरून जात असताना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पर्यटकाच्या गाडीने सावरवाड येथील सद्यस्थितीत बंद असलेल्या पोलीस चेकपोस्ट इमारतीला जोरदार धडक दिली.
या धडकेत इमारतीचा दगडी कठडा फोडून गाडी थेट इमारतीच्या शेडमध्ये घुसली. यात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गाडी इमारतीवर आदळताच चालकाच्या आणि शेजारील प्रवाशांच्या समोरील एअरबॅग्ज उघडल्या गेल्याने चालकासह पुढील प्रवासी तसेच गाडीतील दोन महिला सुदैवाने बचावल्या, अशी माहिती प्राप्त झाली.