Saturday, October 18, 2025
Happy Diwali

अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी विद्यापीठ पुरवणार प्रश्नसंच

अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी विद्यापीठ पुरवणार प्रश्नसंच

मुंबई : महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या परीक्षा १ जून ते १५ जुलै दरम्यान होणार असून यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच पुरवले जाणार आहेत. दोन पेपरमध्ये २ दिवसांचे अंतर असेल.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू होते. यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांना उपकरणांच्या अनुपलब्धतेमुळे शिक्षण घेता येत नव्हते. शिक्षकांनाही तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

टाळेबंदीचा कालावधी लांबत गेला तसे विद्यार्थी आणि शिक्षकांनी शिक्षणाच्या ऑनलाइन पद्धतीशी जुळवून घेतले; मात्र तरीही प्रत्यक्ष अध्यापनाइतके प्रभावी अध्यापन आणि अध्ययन या काळात होऊ शकले नाही. विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव राहिला नाही. त्यामुळे परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात इथपासून ते परीक्षा होऊच नयेत, पर्यंत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समाजात उमटू लागल्या होत्या. यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनेही केली.

ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठीची ठोस यंत्रणा कोणत्याही विद्यापीठाकडे नव्हती. तरीही गतवर्षी ऑनलाइन परीक्षांचा प्रयोग करण्यात आला. यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. टाळेबंदी मागे घेण्यात आली. परिणामी, शाळा-महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. मात्र वर्षभर ऑनलाइन शिक्षण झाल्याने परीक्षाही ऑनलाइन व्हाव्यात अशी मागणी कायम राहिली. याबाबत सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली. या बैठकीचा तपशील त्यांनी ट्विटरवर जाहीर केला आहे.

"कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरू ठाम आहेत. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्नसंच दिले जाणार आहेत. दोन पेपरच्या मध्ये २ दिवसांचे अंतर असणार आहे. परीक्षा मेमध्ये न घेता १ जून ते १५ जुलैपर्यंत होतील", असे सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >