Monday, May 12, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

औरंगाबादमध्ये जमावबंदी नाही, राज ठाकरेंच्या सभेबाबतही आयुक्तांनी केला खूलासा

औरंगाबादमध्ये जमावबंदी नाही, राज ठाकरेंच्या सभेबाबतही आयुक्तांनी केला खूलासा

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आजपासून जमावबंदी म्हणजे कलम १४४ लागू करण्यात आला आहे, असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. हे वृत्त औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी फेटाळून लावले आहे. औरंगाबादमध्ये जमावबंदीचे कुठलेही आदेश जारी करण्यात आलेले नाहीत, असे औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी स्पष्ट केले.


तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा आयोजित केली आली आहे. या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी केली आहे. राज्याच्या विविध भागातून हजारो कार्यकर्ते या सभेला येणार आहेत. पण या सभेला अद्याप पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. यामुळे ही सभा होणार की नाही? यावर पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी आज मोठी माहिती दिली.


गुप्ता यांनी सांगितले की, औरंगाबादमध्ये कलम ३७ (१) व (३) नुसार आदेश जारी करण्यात आले आहेत. असे आदेश आम्ही गरजेनुसार जारी करत असतो. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली वाढल्यावर किंवा लाठ्याकाठ्या आणि छोटी हत्यारं बाळगण्यास मज्जाव करण्यासाठी आम्ही असे आदेश जारी करत असतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि वर्षभर असे आदेश जारी करत असतो. कुठल्याही प्रकारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर किंवा कुठल्याही विशिष्ट कारणाने आदेश काढले जात नाहीत. हे एक नियमित आदेश आहेत, असे आयुक्त गुप्ता म्हणाले. औरंगाबाद शहरात कलम १४४ चा जमावबंदीचा आदेश काढण्यात आलेला नाही, असे पुन्हा एकदा आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.


राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हे शस्त्रबंदीचे आदेश जारी केलेले नाहीत. कुठल्याही सभेच्या पार्श्वभूमीवर असे विशेष आदेश काढण्यात येत नाही, तर समाजामध्ये दैनंदिन ज्या घडामोडी घडत असतात, धरणे आंदोलन, मोर्चे आणि सभा या प्रत्येकवेळी हे आदेश असतात, असे आयुक्त गुप्ता म्हणाले. राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत निर्णय झाला का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. निर्णय झाल्यावर आम्ही कळवू, असे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितले.

Comments
Add Comment