मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत. याबाबत चांदीवाल आयोगाने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आज मंगळवारी (ता.२६) चांदीवाल आयोगाचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला आहे.
परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्बमधून १०० कोटी रुपयांचा आरोप अनिल देशमुखांवर केला होता. या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आयोगाच्या अहवालात स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चांदीवाल आयोगाने सचिन वाझे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांचे जबाब घेतले होते. आयोगाच्या अहवालातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिनचीट देण्यात आल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.