Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे रेल्वे स्थानक फेरीवाल्यांच्या मगरमिठीत...

ठाणे रेल्वे स्थानक फेरीवाल्यांच्या मगरमिठीत…

कायमस्वरूपी वचक बसेल अशी कारवाई गरजेची

अतुल जाधव

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाले खाद्यपदार्थ शिजवण्यासाठी चक्क रस्त्यावरच गॅस सिलिंडरचा खुलेआम वापर करत असल्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विशेष म्हणजे या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आवाज उठवून देखील प्रशासन बेकायदेशीर फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने रेल्वेस्थानक परिसरात नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या विधानात तथ्य असल्याची चर्चा आहे. अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे गॅस सिलिंडर हे रेल्वे स्थानक परिसरात कारवाईसाठी जात असलेल्या महापालिका अतिक्रमण पथकाला कसे दिसत नाहीत? याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डोळे असून धृतराष्ट्राच्या भूमिकेत शिरणाऱ्या प्रशासनाला रेल्वे स्थानक परिसरात मोठी दुर्घटना घडल्यावर जाग येणार का? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर अंतरात फेरीवाल्यांनी बसू नये या आदेशाची विल्हेवाट लावण्यात आली असून न्यायालयाचा देखील अवमान होत असताना प्रशासन सोयीस्कररीत्या मूग गिळून बसले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर फेरफटका मारला असता अक्षरशः आपण एखाद्या मोठ्या बाजारपेठेत असल्याचा भास होतो. रेल्वे स्थानकाबाहेर पडताच रस्ता आणि पदपथाचा ताबा फेरीवाल्यांनी घेतला असल्याचे दिसून येते. धकाधकीच्या रेल्वे प्रवासातून ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर बाहेर पडण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. महिला रेल्वे प्रवाशांची वाट अधिक खडतर असते. गर्दीचा फायदा घेऊन जाणीवपूर्वक धक्काबुक्की करणाऱ्यांचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकाबाहेर अनागोंदी असून रेल्वे प्रवाशाना स्थानका बाहेर पडताच फेरीवाल्यांचा वेढा ओलांडून वाट शोधावी लागते. या परिसरात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून प्रशस्त पदपथ निर्माण केले आहेत; परंतु याचा फायदा फेरीवाल्यांनाच अधिक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट असे चित्र ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सकाळ, संध्याकाळ अनुभवता येते. या ठिकाणी रेल्वे स्थानका बाहेर १५० मीटरचे निर्बंध पालन कुठेही होताना दिसत नाही.

ठाणे स्थानकाबाहेरच नव्हे, तर स्थानकातील पुलावरदेखील फेरीवाले मुक्काम ठोकून असतात. ऐन गर्दीच्या वेळेसही या फेरीवाल्यांवर कारवाई होताना दिसत नाही. रेल्वे स्थानकात टिकीट खिडकीजवळच पादचारी पुलाजवळच रिक्षाचालक आणि फेरीवाले घेरतात. छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी परिसरास विळखा घातलेला आहे. त्यातून मार्ग काढणे जिकिरीचे ठरते. फेरीवाले, रिक्षाचालकांनी इथल्या जागेचा ताबा घेतल्यासारखी स्थिती आहे. त्यांना रोखण्यात पालिका प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणा अप यशी ठरली आहे. ठाणे पश्चिमेस स्टेशन जवळच रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) मुख्य ठाणे असूनही दुर्लक्ष होत असल्याबद्दल रेल्वे प्रवाशामध्ये संताप आहे. फेरीवाल्यांचा त्रासातून स्कायवॉकची देखील सुटका झालेली नाही.

स्कायवॉकवर मोबाइलचे स्टँड, ट्रायपॉड, ब्लुटूथ स्पीकर, हेडफोन विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. नाही म्हणायला ठाणे महापालिकेची एक गाडी अधूनमधून स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी दिसते. तेवढ्यापुरते फेरीवाले पसार होतात; परंतु पुन्हा त्याच ठिकाणी आपले बसवताना फेरीवाले १५० मीटरच्या आत बसतात, हा न्यायालयाचा अवमान आहे. पण एकाही अधिकाऱ्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई झालेली नाही. काही वेळा पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या गाड्या येतात. पण ही कारवाई सातत्याने होत नाही. केवळ नोंद करण्यापुरता कारवाईचा देखावा यंत्रणांकडून केला जातो.

सॅटीस पुलाखालील सर्व जागा फेरीवाल्यांनी व्यापल्या असून सिलिंडर गॅस, सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याने इतर प्रवाशांची, विशेषत: महिला प्रवाशांनी मोठी घुसमट होऊ लागली आहे. महापालिकेकडून कारवाई केल्यानंतर तेवढ्यापुरते हे प्रकार थांबत असले, तरी पुन्हा फेरीवाल्यांचा जाच सुरू असतो. रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दीच्या मधोमध उभे राहून हे फेरीवाले उद्योग करत असल्याने त्यांच्यावर कोणाकडूनही कारवाई होत नाही. ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांच्या उपद्रवाविरोधात महापालिका आयुक्तांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्याच स्तरातून आंदोलने करण्यात आली होती. न्यायालयानेही स्थानक परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ करण्याचे आदेश देऊन १५० मीटरवर सीमारेषा आखण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही काळ फेरीवाल्यांनी स्टेशन परिसरातून काढता पाय घेतला होता; परंतु कारवाई थंडावल्यानंतर फेरीवाल्यांनी आपला मोर्चा पुन्हा स्टेशन भागात वळवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -