Monday, May 5, 2025

क्रीडा

शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबई (प्रतिनिधी) : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित १३व्या राज्य मानांकन स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात अंतिम फेरीत मुंबईच्या प्रशांत मोरेने मुंबईच्याच विकास धारियाला २५-१३, १८-११ असे सहज दोन सेटमध्ये हरवून विजेतेपद पटकाविले. फॉर्मात असलेल्या प्रशांतने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड ठेवली होती. दुसऱ्या सेटमध्ये तिसऱ्या बोर्डापर्यंत विकासने ९-३ अशी आघाडी घेतली होती; परंतु नंतर त्याला ती टिकवता आली नाही.

महिलांच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच मुंबई बाहेरील दोन खेळाडू अंतिम फेरीत आले होते. त्यामध्ये रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणला २५-१३, १८-११ असे हरवून बाजी मारली. पहिल्या सेटमध्ये सहाव्या बोर्डापर्यंत दोनही खेळाडूंचे १३-१३ असे समान गुण झाले असल्याने हा सामना चांगला रंगेल, असा प्रेक्षकांचा अंदाज फोल ठरला. सारस्वत बँक व इंडियन ऑइल कंपनीने पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त किरण दिगावकर यांच्या हस्ते पार पडला.

विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी जिमखानाचे सचिव संजीव खानोलकर, ट्रस्टी लता देसाई व प्रकाश नाईक, सहसचिव सुनील रामचंद्रन, खजिनदार विलास सोमण, उप कार्याध्यक्ष विश्वास नेरुरकर, इनडोअर सचिव विजय अल्वा, उपाध्यक्ष समीर पेठे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव यतिन ठाकूर, मुंबई जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष धनंजय पवार आदी मंडळी उपस्थित होती.

पायाने खेळणाऱ्या अपंग कॅरम खेळाडू हर्षद गोठणकर याला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये मुंबई उपनगरच्या संदीप दिवेने पुण्याच्या अभिजीत त्रीपनकरवर २५-७, १२-२५ व २४-८ अशी मात केली, तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात फॉर्मात असलेल्या मुंबईच्या नीलम घोडकेने मुंबईच्याच प्रिती खेडेकरवर २१-६, २५-० असा सोपा विजय नोंदविला.

Comments
Add Comment