पुणे (वृत्तसंस्था) : गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या राजस्थानसमोर मंगळवारी बंगळूरुचे आव्हान आहे. दोन्ही संघांनी ५ सामने जिंकत १० गुण मिळवले असून दोन्ही संघ सहाव्या विजयासाठी उत्सुक आहेत. हा सामना पुण्यातील स्टेडियममध्ये रंगणार आहे.
कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या राजस्थानने आतापर्यंत ७ सामने खेळले असून ५ सामन्यांत विजय मिळवला आहे. राजस्थानचा जोस बटलर कमालीचा खेळत असून त्याने यंदाच्या हंगामात आतापर्यंत ३ शतके झळकावली आहेत. त्यामुळे राजस्थानला आतापर्यंत मोठ्या धावसंख्या उभारण्यात यश आले आहे. जोस बटलरला कर्णधार संजू सॅमसन, देवदत्त पडीक्कल यांनी चांगली साथ दिली आहे. त्यांचाही फॉर्म संघासाठी लाभदायक ठरला आहे. वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज शेमरॉन हेटमायर त्यांच्या ताफ्यात आहे.
तसेच रीयान पराग, करूण नायर अष्टपैलू रविचंद्रन अश्वीन असे वेळीच उपयुक्त पडणारे फलंदाज, अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे राजस्थानला फलंदाजीची चिंता नाही. आतापर्यंत फलंदाजांचा समतोल त्यांना विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी करत आहे. पण प्रत्येकवेळी त्यावरच विसंबून राहून चालणार नाही. जर का फॉर्ममध्ये असलेले फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले तर काय? याची तयारी त्यांच्या संघाला करावी लागेल. तशी राजस्थानच्या गोलंदाजांनीही छाप सोडली आहे.
युझवेंद्रने विकेटची हॅटट्रीक घेतली आहे. ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओब्ड मॅकोय, रविचंद्रन अश्वीन, युझवेंद्र चहल असे गोलंदाज त्यांच्या संघात आहेत. युझवेंद्रला धावा रोखण्यात सातत्यपूर्ण यश आले नसले तरी गरजेवेळी विकेट मिळवण्यात तो चांगलाच यशस्वी ठरला आहे. प्रसिद्ध आणि अश्वीन दोघेही प्रभावी गोलंदाजी करत आहेत. ट्रेंट आणि अश्वीन यांच्या गाठीशी अनुभव आहे.
बंगळूरुचा संघ यंदा लयीत आहे. त्यांनी आतापर्यंत ८ पैकी ५ सामन्यांत विजय मिळवला आहे. नेतृत्वबदल त्यांना फळला असून फाफ डु प्लेसीस नेतृत्वासह फलंदाजीतही प्रभावी कामगिरी करत आहे. विराटला अपयशी ठरला असला तरी यापुढे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. मॅक्सवेलचे आगमन झाल्याने बंगळूरुला बळ आले आहे. पण त्यालाही आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलेले नाही. दिनेश कार्तिक, शाहबाज अहमज असे हुकमाचे एक्के त्यांच्या संघात आहेत.
एकहाती सामना जिंकवण्याची ताकद दिनेश कार्तिककडे आहे. त्यामुळे बंगळूरुची फलंदाजी लांबलचक असून तगडे फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. तसेच जोश हेझलवूड गोलंदाजीत लक्षवेधी कामगिरी करत आहे. त्याच्या जोडीला मॅक्सवेल, शाहबाज अहमज हे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे बंगळूरुकडे गोलंदाजीसाठी पर्याय आहेत.
वेळ : रात्री ७.३० वाजता. ठिकाण : पुणे