Thursday, April 24, 2025
Homeक्रीडाचेन्नईविरुद्ध पंजाबच्या विजयाचा भांगडा

चेन्नईविरुद्ध पंजाबच्या विजयाचा भांगडा

धवन, रबाडा, अर्शदीप चमकले

मुंबई (प्रतिनिधी) : शिखर धवनच्या नाबाद ८८ धावा आणि कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग यांची अप्रतिम गोलंदाजी यामुळे पंजाबने सोमवारी चेन्नईविरुद्ध विजयाचा भांगडा केला. पंजाबने चेन्नईला ११ धावांनी पराभूत करत यंदाच्या हंगामातील चौथा विजय मिळवला. पंजाबच्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या चेन्नईच्या संघाची सुरुवात अडखळतच झाली. दुसऱ्याच षटकात उथाप्पाच्या रुपाने चेन्नईला पहिला धक्का बसला. संदीप शर्माने उथाप्पाचा अडथळा दूर केला. त्यानंतर रुतुराज गाडकवाड एका बाजूने धावा करत होता मात्र दुसऱ्या बाजूने विकेट जाण्याचे सत्र सुरू होते.

सँटनर अवघ्या ९ धावा करून माघारी परतला तर शिवम दुबेने अवघ्या ८ धावा केल्या. त्यामुळे ४० धावांवर चेन्नईचे ३ फलंदाज बाद झाले. त्यानंतर रुतुराजने अंबाती रायडूला साथ देत संघाची धावसंख्या खेळती ठेवली. पण रुतुराजचाही संयम सुटला. रबाडाने अगरवालकरवी झेलबाद करत रुतुराजला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ८९ धावांवर त्यांचे ४ फलंदाज माघारी परतले होते.

रुतुराजने २७ चेंडूंत ३० धावा केल्या. त्यानंतर अंबाती रायडूने फलंदाजीची सूत्रे हाती घेत धडाकेबाज कामगिरी केली. त्याने पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रायडूने ३९ चेंडूंत ७८ धावा करत चेन्नईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. शेवटच्या षटकात महेंद्रसिंह धोनीने षटकार ठोकत सामन्याची रंगत वाढवली. मात्र त्यालाही संघाला विजय मिळवून देता आला नाही. कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग यांनी प्रभावी गोलंदाजी करत पंजाबला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी चेन्नईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पंजाबची सुरुवात संयमी झाली. ५ षटकांपर्यंत त्यांना विकेट टिकविण्यात यश आले पण धावांचा वेग वाढवता आला नव्हता. संघाच्या ६ व्या षटकात थिकशनाने दुबेकरवी कर्णधार मयांक अगरवालचा अडथळा दूर केला. मयांकने २१ चेंडूंत अवघ्या १८ धावा केल्या. त्यानंतर शिखर धवन आणि भानुका राजापक्षा यांना संघाच्या धावसंख्येचा वेग वाढविण्यात यश आले. या जोडीने ११० धावांची भागीदारी करत पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. शिखर धवनने ५९ चेंडूंत नाबाद ८८ धावा केल्या. तर भानुका राजापक्षाने ३२ चेंडूंत ४२ धावांची खेळी केली.

त्यामुळे पंजाबने २० षटकांअखेर ४ फलंदाजांच्या बदल्यात १८७ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. चेन्नईच्या महिश थिकशनाने प्रभावी गोलंदाजी केली. महिश थिकशनाने ४ षटकांत १ विकेट मिळवत ३२ धावा दिल्या. ब्राव्होने २ विकेट मिळवले, पण त्याला धावा रोखण्यात यश आले नाही. त्याने ४ षटकांत ४२ धावा दिल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -