सिंधुदुर्ग (हिं.स.) : आपत्ती कधी, केव्हा, कशी येईल हे सांगता येत नाही. येणाऱ्या मान्सून काळात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली तर या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणाने सज्ज राहावे, यासाठी सर्व विभागाने आपत्ती निवारणाचे नियोजन आराखडे तयार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास सादर करावे. त्याचबरोबर तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या बैठकांचे आयोजन करुन योग्य ते नियोजन करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण तथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह (जुने) येथे मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार, तालुका गटविकास अधिकारी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड पुढे म्हणाले की, आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सर्वंच यंत्रणांनी आराखडे तयार करताना प्रत्येक बाबींचा विचारात घेऊन त्याप्रमाणे नियोजन असावे. संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवल्यास हानी होऊ नये, याबाबत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने आराखड्यांचे नियोजन करावे. संभाव्य पूरपरिस्थितीत जलसंपदा विभागाने पाणी विसर्गाचे योग्य नियोजन करावे. पावसाळ्याच्या काळात घाट रस्ते दरड कोसळून बंद होऊ नये यासाठी बांधकाम विभागाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. त्याचबरोबर मानवी वस्तीच्या ठिकाणी दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, अशी गावे निश्चित करून या ठिकाणी करावयाचा उपाययोजनाचा प्रस्ताव तयार करुन प्रशासनास सादर करावा.
तसेच जिल्ह्यामध्ये विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरणने सर्व वीजपुरवठा यंत्रणेची तपासणी करावी व आवश्यक त्या ठिकाणाची कामे तातडीने पूर्ण करावी. पूरकाळात बोटींची अत्यंत महत्त्वाची भूमिका असून त्या सुस्थितीत आहेत किंवा कशा याबाबत तपासणी करुन बोटींची दुरस्ती करुन ठेवावी, असे सांगून भडकवाड पुढे म्हणाले की, मान्सून काळात पूरपरिस्थिती उद्भल्यास सर्वंची यंत्रणांनी आपापल्या संपर्क यंत्रणा अद्ययावत कराव्यात व समन्वयाने कामकाज पार पाडण्यासाठी आवश्यक बाबी यांचे नियोजन करावे. त्याचबरोबर एनडीआरएफच्या पथकाच्या संपर्कात राहून उद्भवलेली परिस्थिती सावरण्यासाठी तत्काळ पाचारण करता यावे तसेच एनडीआरएफची पथके ज्या ठिकाणी आवश्यक आहेत, त्या ठिकाणी पोहोचवता यावी यासाठी आतापासूनच तालुका स्तरावरून नियोजन करावेत, असेही ते म्हणाले.